Monday , June 17 2024
Breaking News

सामाजिक कार्यकर्ते विश्वास धुराजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त….

Spread the love

 

बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि समाज सुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृत महोत्सव आज बुधवार दि. २९ मे रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजिण्यात आला आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त निवृत्त प्राचार्या विनोदिनी मुरकुटे यांनी घेतलेला आढावा…

श्री. विश्वास नारायण धुराजी आणि मी विनोदिनी मुरकुटे आम्ही आते- मामे भावंड परंतु आईचे माहेर हाकेच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही नेहमी मामांच्या घरी रहात होतो. आम्ही सहा जण व विश्वास, शिवाजी असे आठ जण सख्या भावंडाप्रमाणे रहात असू. मामा त्यावेळी नगरपालिकेत नोकरीला होते. घरी गाई, गुरे होती, मामा अतिशय हुषार होते. त्यावेळचे ते मुलकी पास होते. त्यांना पावकी, निमकी, दिडकी हे सर्व पाढे तोंडपाठ होते. श्री जोतिबाच्या किती तरी आरत्या त्यांना तोंडपाठ होत्या. काही आरत्या त्यांनी स्वतःही रचल्या होत्या. घरात पोथीवाचन, श्री जोतिबाची नियमित पायी वारी अशा भक्तिमय वातावरणात विश्वासचे बालपण गेले. मामांचे अध्यात्मिक संस्कार नेहमी होत होते. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने आपली वाटचाल पुढे ठेवली आहे. श्री जोतिबा मंदिरात त्याची सतत सेवा असते. सर्व कामात पुढाकार असतोच त्याचबरोबर विश्वासचा चिरंजीव रवी धुराजी हा देखील हिरीरीने भाग घेतो. जवळजवळ तीन पिढ्या श्री जोतिबाची सेवा सतत करीत आहेत.
विश्वासचा जन्म २८ मे १९५० साली झाला. प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी मुलांची शाळा नं. ५ मध्ये झाले. माध्यमिक शिक्षण बेनन् स्मिथ हायस्कुल व कॉलेजचे शिक्षण गोगटे महाविद्यालयात झाले. १९७१ साली बहुजन समाजाने स्थापन केलेल्या मराठा को-ऑफ बँकेमध्ये नोकरी मिळाली. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे १९८९ साली मार्कट यार्ड मधील शाखेत शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. २००५ साली बसवाण गल्लीतील मुख्य शाखेत जनरल मॅनेजर म्हणून बढती झाली. त्यादरम्यान बँकेचा एन. पी. ए. ४९ टक्क्यावर गेला होता. तो कमी करणे महत्वाचे होते. म्हणून संचालक मंडळ व सहकार्यांना विश्वासात घेवून बँकेचा एन. पी. ए. १८ टक्क्यावर आणला. या प्रसंगाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार माननीय श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
बँकींग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक बांधीलकी म्हणून १९८९ सालापासून योग शिक्षकाचे काम मोफतपणे सुरू केले. बालमनावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून बेळगावात बाल संस्कार शिबिरे सुरू केली. जायंटस ग्रुप ऑफ बेळगावचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. श्री मारूती मंगल कार्यालय व श्री जोतिबा मंदिरात ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर श्री परूळेकर महाराज यांच्या दिंडीतून पायी पंढरीची वारी केली. मामांनी सांगितलेल्या पौराणिक कथा, चरित्रे, पोथ्या यांच्या श्रवणाने त्याच्यावर अनेक चांगले संस्कार झाले.
आई-वडिलांची सेवा त्याने अतिशय प्रेमळपणाने केली. त्याच्या सर्व कार्यात त्याची पत्नी स्मिता विश्वास धुराजी म्हणजे माझ्या वहिणीने मोलाची साथ दिली. एका यशस्वी पुरूषाच्या मागे त्याच्या पत्नीची मोलाची साथ हवी असते. तशीच साथ माझ्या वहिणीने, मुलगा रवीने व मुलगी उषाने दिली. त्यामुळे त्याच्या आयुष्याचे सार्थक झाले.
ईश्वर त्याला उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो व ईश्वराची सेवा त्याच्या हातून सतत घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना!

निवृत प्राचार्य : विनोदिनी मुरकुटे

About Belgaum Varta

Check Also

मर्कंटाईल सोसायटीला जॉईंट रजिस्ट्रार यांची भेट

Spread the love  बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *