बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव महापालिका व्याप्तितील पाईपलाईन रोड विजयनगर येथील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान ग्रामीण आमदार यांनी कामाचा शुभारंभ केला. कामाला सुरुवात केली. पण आज देखील काम पूर्णत्वास गेले नाही. पाईपलाईन रोड अत्यंत दुर्वस्थेत होता त्यामुळे मागच्या वर्षी रोडचा मध्यावर असलेला २०० मीटर भाग पेवर्स व दूतर्फा गटारी करून करण्यात आला. उर्वरित रस्त्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केले गेले. यात देखील सुरवातीला पाईपलाईन रोडची सुरुवात असणाऱ्या मारुती मंदिर येथून शेवट बाची रोड पर्यंत करण्याचे आश्वासन दिले गेले होते पण फक्त ४०० मीटर रस्ता करण्यात येत आहे. उर्वरित रस्त्याचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध न झाल्याचे कारण देण्यात येत आहेत. याउलट जेथे रस्ता बनविला जात आहे त्या ठिकाणी असणारी जुनी सुस्थितीत असणारी गटारी काढून पुन्हा नवीन बांधण्यात आली आणि त्याच ठिकाणी जिथे अजिबात गटार व्यवस्था नाही तो भाग मात्र टाळण्यात आला. सुरवातीला नागरिकांनी या संबंधी विचारले असता नंतर गटार बांधण्यात येईल असे सांगून वेळ मारून नेण्यात आली. पण आता रस्त्याचे काम पूर्णत्वास जात आहे तेव्हा थातुर मातुर करणे देत पन्हाळी सदृश्य गटार करू असे सांगून नागरिकांना धुडकावून लावण्यात येत आहे. मुळात या ठिकाणी काँक्रिट गटारची गरज असताना तेथे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी अधिकाऱ्यांना या बाबत प्रश्न विचारले असता पाईपलाईन आहे म्हणून सुरवातीला टाळले गेले पण नंतर नमुना दाखल गटारीसाठी खड्डे खणण्यात आले तेव्हा स्मार्ट सिटी मंडळाकडे पैसे नाहीत गटार करण्यासाठी म्हणून सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांनी या संबंधी स्मार्ट सिटीच्या कार्यकारी अधिकारी सईदा अफ्रिन बानो यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी लोकांनी पैसे जमा करून द्या आम्ही गटार बनवितो अशी उद्धट उत्तरे दिली. जर निधीची कमी होती तर जिथे गटार होती तेथील गटार पुन्हा का करण्यात आली? आणि रस्त्याचे काम जिथपर्यंत केले आहे तिथपर्यंत दुतर्फा गटार करणे आवश्यक असताना फक्त १०० मीटर गटार करण्यासाठी निधी संपल्याची कारणे दिली जात आहेत. या १०० मीटर मधील नागरिकांना सांड पाणी सोडण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही गेली ४० वर्षे येथील नागरिक घरासमोर रस्त्याशेजारी खड्डा खणून त्यात सांडपाणी सोडले होते पण रस्त्याच्या निर्मितीमुळे ती परिस्थिती देखील आता राहिली नाही त्यामुळे नागरिकांनी सांडपाणी सोडायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटीच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.