बेळगाव (वार्ता) : म. ए. समितीचे माजी नगरसेवक आणि एपीएमसी माजी अध्यक्ष, कलमेश्वर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष परशराम बेडका वय 60 वर्षे रा. बसवण कुडची बेळगाव यांचे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
रात्री साडे नऊ वाजता त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा काहीही उपयोग न झाल्याने सव्वा दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
बेडका यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं बेळगाव एपीएमसीचे अध्यक्ष पद व कुडची भागातुन नगरसेवक पद भूषविले होते. त्यांच्या निधनाने पूर्व भागातील समितीचे ज्येष्ठ नेतृत्व हरपलं आहे.
बसवणं कुडची येथे कलमेश्वर सोसायटीच्या माध्यमातून अनेक गोर-गरीब शेतकऱ्यांना मदत केली होती. ते सहकारी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील नेतृत्व हरपलं अशी भावना व्यक्त केली जात आहे. रविवारी दुपारी त्यांच्यावर कुडची येथे अंतिम संस्कार होणार आहेत.