रयत संघटनेची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांची भेट
निपाणी (वार्ता) : जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे बेळगावसह निपाणी, चिकोडी परिसरातील झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली आहे. पाऊस कमी झाला असून पूर परिस्थिती आहे. नद्यांची पाणीपातळी कमी झाल्यानंतर नुकसानीचा नि:पक्षपातीपणे सर्वे करून संबंधितांना भरपाई द्यावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी माजी मुख्यमंत्री खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली. बेळगाव येथे भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली.
राजू पोवार म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांच्या नुकसानीसह घरांच्या पडझडी झाल्या आहेत. सर्वे होऊनही आज तगायत नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत बऱ्याचदा तहसीलदारापासून मुख्यमंत्र्यापर्यंत कळवूनही दुर्लक्ष झाले आहे.
यंदाही नदी काठासह परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, ऊस, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही अनेक गावातील पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांची घरे पडली असून त्यांचा नि:पक्षपतिपणे सर्वे केला पाहिजे. पूर ओसरताच संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेच्या सूचना देण्याची मागणीही त्यांनी खासदार शेट्टर यांच्याकडे केली. यावेळी विश्वनाथ किल्लेदार, काशिनाथ कुरणी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.