बेळगाव (वार्ता) : देशातील कर्नाटकसह पाच राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाही राज्य सरकारने शनिवार व रविवारी लागू करण्यात आलेला विकेंड कर्फ्यु मागे घेतला आहे. परिणामी शहरातील खासबागच्या रविवारच्या आठवडी बाजारात आज रविवारी पुन्हा एकदा खरेदीसाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोरोनाला निमंत्रण देणारी ही गर्दी चिंतेचा विषय बनली आहे.
विकेंड कर्फ्यु मागे घेतल्यानंतर काल शनिवारपासून बाजारपेठेत पुन्हा एकदा गर्दी पाहायला मिळत आहे. खासबाग आठवडी बाजारात आज रविवारी परगावचे भाजी विक्रेते तसेच खरेदीदारांची गर्दी वाढली होती. गेल्या 15 दिवसांपासून बेळगाव परिसरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यातच विकेंड कर्फ्यु मागे घेतल्यामुळे बाजारात गर्दी वाढल्यामुळे कोरोनाचा धोका कायम आहे.
खासबाग येथे आज रविवारच्या आठवडी बाजारात गर्दी प्रमाणाबाहेर वाढल्याचे पाहायला मिळाले. यातच विक्रेते आणि ग्राहकांमध्ये फेसमास्क विना व्यवहार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यातून पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका स्पष्ट दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन रविवारच्या खासबाग आठवडी बाजारावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे मत जाणकारात व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने विकेंड कर्फ्यु मागे घेतल्यामुळे बर्याच दिवसानंतर शनिवार-रविवारी बाजारात गर्दी पाहायला मिळाली. मागील दोन आठवड्यात विकेंड कर्फ्यु काळात बाजारात शुकशुकाट पसरल्याचे पहावयास मिळाले होते. मात्र विकेंड कर्फ्युचा कालावधी संपताच शहरातील बाजारात कालपासून नागरिकांची खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे.
परिणामी बाजारपेठेतील उलाढाल पूर्वपदावर येत आहे. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, काकतीवेस रोड, शनिवार खूट आदी भागात आज रविवारी खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली. दोन आठवडे विकेंड कर्फ्यू काळात बाजारपेठ बंद राहिल्याने व्यापारी व कष्टकर्यांना फटका बसला होता. दोन आठवड्यात चार दिवस बाजारपेठ बंद राहिल्याने अडचणी वाढल्या होत्या.
