बेळगाव : बेळवट्टी येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात नुकताच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार तसेच विद्यार्थी दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात पार पडला.
माजी विद्यार्थी संघटना, ईमारत बांधकाम कमिटी आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यु. एस. होनगेकर होते. संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी, संचालक बी. बी. देसाई, शिवशक्ती मिनरल बेळगाव संचालक रवि बळिकाई व विवेक पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थीनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी मुख्याध्यापक पी. एम. बेळगांवकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ज्ञानेश्वर चौगुले यांनी सरस्वती पूजन केले. मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या अनुक्रमे श्रुती पाटील, स्वाती होसुरकर, सलोनी पाटील, सुहानी देसाई, संजना नलावडे यांना रोख बक्षिसे व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. दहावी परीक्षेतील पहिल्या तीन क्रमांकांना शिवशक्ती मिनरलचे रवि बळीकाई व विवेक पाटील यांनी अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार व पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. आर. बी. देसाई, सातेरी चौगुले यांनीही रोख बक्षिस देऊन गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
बेळवट्टी ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा महादेवी मेदार व राष्ट्रीय पुरस्कार विजेते माजी तालुका पंचायत सदस्य एन. के. नलावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
बी. बी. देसाई, अविनाश बडवानाचे, एस. व्ही. चांदीलकर, सातेरी चौगुले आदींनी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली.
कार्यक्रमात विजय नंदीहळ्ळी, बी. बी. देसाई, के. डी. पाटील, आर. बी. देसाई, एन. के. नलावडे आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
कार्यक्रमास एन. एस. गाडेकर, बाळुकु नलवडे, ज्ञानेश्वर चौगुले, मारुती होसुरकर, यांची विशेष उपस्थिती होती. व्हीं. एस. चांदिलकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.