बेळगाव : मराठा मंडळ व सेंट्रल हायस्कूलचे मराठीचे प्रसिद्ध शिक्षक श्री. वि. गो. साठे गुरुजींच्या सर्व विद्यार्थ्यांचा मेळावा शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी मराठी विद्यानिकेतनच्या प्रांगणात संपन्न झाला. या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला साठे गुरुजींचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्याचे स्वागत श्री. सुभाष ओऊळकर तर प्रास्ताविक श्री. मालोजी अष्टेकर यांनी केले.
साठे गुरुजींच्या विद्यार्थी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपली मनोगते तसेच साठे गुरुजींच्या सागर लाट या काव्यसंग्रहातील कवितांचे सादरीकरण केले. उद्घाटनपर मनोगतात सुरेंद्र कामत, मुंबई यांनी आपल्या मनोगतात माणसाचे जीवन म्हणजे वावटळीने उडणाऱ्या असंख्य धुलीगणांचा पसारा, हे असंख्य धुलीकण जमिनीचा वेध घेत इतरत्र विहरत असतात. त्यातलाच एखादा कण एकत्र करून त्या सर्वांचा एकसंघ आकार घेऊन जमिनीवरती स्थिरावतो. असा स्थिरावणारा एक मध्यवर्ती कण असतोच. साठे सरांनी अशा मध्यवर्ती कणांची भूमिका बजावली आणि असंख्य विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीचा मार्ग दाखविला. केवळ मराठी हा भाषा विषय त्यांनी शिकविला नाही तर व्यवहारी जगात ताठ मानेने सुसंस्कृतपणे जगण्याचे धडे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले, अशी आपली भावना व्यक्त केली.
साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी आपल्या मनोगतात साठे सरांनी तरुण वयापासून काव्य, ललित निबंध लेखनास प्रारंभ केला. मराठी भाषेबद्दल असणारी आत्मीयता आणि त्यातून अभ्यासपूर्ण सायासाने लाभलेले प्रभुत्व यांचा प्रत्यय त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येतो याची जाणीव करून दिली.
श्री. सुभाष ओऊळकर यांनी साठे सरांच्या आठवणींना उजाळा दिला यामध्ये त्यांनी सरांची रसाळ मिठ्ठास वाणी, स्पष्ट शब्दोचार, भाषेची शुद्धता, टापटीप पणा, स्वच्छता आणि वक्तशीरपणा या साठे सरांच्या गुणांचा विद्यार्थ्यांवर ही परिणाम झाला होता याचा आधार दिला. साठे सरांचे लोभसवाणे व्यक्तिमत्व आज देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करते. व्यवसाय नोकरी निमित्त परगावी राहणारे त्यांचे विद्यार्थी बेळगावला येत तेव्हा साठे सरांना आवर्जून भेटत असत, याचे दाखले देऊन त्यांच्या आठवणींचा उजाळा घेतला. या मेळाव्यात नीलू आपटे, स्नेहल हुद्दार, हर्षदा सुंठणकर यांनी सागरलाट या काव्यसंग्रहातील कवितांचे सादरीकरण केले. तर या मेळाव्याचे आभार साठे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांनी मानले.