अशाप्रकारच्या जटील व जोखमीच्या मेंदूच्या १०२ अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल अनोखा विक्रम
बेळगाव : एका बाजूला रुग्ण स्वतः बासुरी वाजवत आहे आणि दुसऱ्या बाजूला रुग्णावर मेंदूची जटील अशी मेंदूची शस्त्रक्रिया पार पाडली जात आहे असे दृश्य सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संस्कार विभागात पाहायला मिळाले. ज्या रुग्णांच्या मेंदूतील संवेदनशील अशा भाषेच्या अथवा नियंत्रण भागात जर गाट असेल तर रुग्णाची बोलण्याची अथवा नियंत्रक शक्ती नष्ट होवू शकते. अशा वेळी रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना रुग्णास जागे ठेवणे अत्यंत गरजेचे असते. जागा असणाऱ्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणे हि जोखमीची गोष्ट असली तरी रुग्णाच्या दुष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असते. या रुग्णाच्या बाबतीत रुग्णाची बासुरी वाजवण्याची क्षमता नष्ट होऊ नये, यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉ. शिवशंकर मरजाक्के व त्यांच्या टीमने रुग्णास बासुरी वाजवायला सांगून दुसऱ्या बाजूने शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. अशा प्रकारच्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल १०२ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व जोखमीच्या समजल्या जाणाऱ्या अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. अशा मेंदूच्या आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात, तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषेदेत केले.
यावेळी ते पुढे म्हणाले, पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. या सेवा शृंखलेत रुग्णालयातील संस्कार (मेंदू विभाग) विभागाने मेंदूच्या तब्बल १०२ अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे.
आपण नेहमी विविध शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो, पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेची गरज असते, अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील मोजक्याच्या ठिकाणी सर्व उपकरणांसह केली जाते, अन्यथा इतर ठिकाणी हि उपकरणे नसल्यामुळे रुग्णांना गंभीर व कायमची हानी होऊ शकते. अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल १०२ शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडले आहे.
मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतो. यासाठी शरीरातून विविध धमनी (शीर) यांच्या मार्फत मेंदूचे सर्व शरीरनियंत्रण कार्य होत असते.बोलणे, ऐकणे, चालणे, प्रतिसाद देणे, बघणे अशा अनेक क्रिया मेंदूच्या संवेदनेतून होत असतात. जर मेंदूमध्ये एखादी गाठ झालेला रुग्ण आला तर त्याच्या सर्व क्रिया पूर्वीसारख्या होण्यासाठी मेंदूच्या संवेदनशील भागाला स्पर्श न करता ती गाठ काढली तरच ती शस्त्रक्रिया यशस्वी होते. त्यामुळे रुग्ण पूर्वीसारखा होण्यासाठी यात अत्यंत अचूकता ठेवणे गरजेचे असते. सामान्यत: अनेक मेंदूच्या शस्त्रक्रियेत पूर्णतः भूल देऊन शस्त्रक्रिया केली जाते. पण मेंदूच्या आतील एखाद्या गाठीची शस्त्रक्रिया करत असताना जर मेंदूच्या नियंत्रक भागाला इजा अथवा धक्का पोहचला तर त्याचे दुष्परिणाम म्हणून शरीरातील एखादा भागात वा नियंत्रण शक्तीला कायमचे अपंगत्व येवू शकते. त्यामुळे अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया करताना रुग्णास जागे ठेवून शस्त्रक्रिया केल्यास अधिक फायदा होऊ शकतो, पण अशा शस्त्रक्रिया करण्यात मोठी जोखीम असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा शस्त्रक्रिया टाळल्या जातात.
अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करत असताना रुग्णासोबत बोलत बोलत शस्त्रक्रिया करावी लागते. अनेकवेळा रुग्ण घाबरण्याची शक्यता अधिक असते तर रुग्णाची हालचाल होण्याची शक्यता हि अधिक असते. अशा वेळी रुग्णाच्या मेंदूतील इतर भागाला इजा होऊ शकते, त्यामुळे अशी जोखमीची शस्त्रक्रिया करणे यासाठी अद्यावत तंत्रज्ञान व कुशल टीम आवश्यक आहे. यासाठी लागणारे तंत्रज्ञान व टीम सिद्धगिरी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे.
सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दोन्ही प्रकारे शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिये मध्ये सिद्धगिरी हॉस्पिटलयेथे अद्यावत असे फंक्शनल एम.आर.आय.मशीन आहे, ज्यात आधुनिक निदान करण्याच्या प्रणाली आहेत. ज्याद्वारे रुग्णाच्या मेंदूतील नियंत्रण भागाला अचूक अधोरेखित करता येते. तसेच इथे उपलब्ध असणाऱ्या ट्रॅक्टोग्राफी तंत्रज्ञानामुळे अशा मेंदूतील विविध नसा रंगांसह रेकॉर्ड केल्या जातात, त्यामुळे त्या भागापर्यंतचा प्रवास सुस्पष्ट होतो. अशा अधोरेखित भागात अचूक ठिकाणी जाण्यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलयेथे न्युरो नेव्हीगेशन मशीन उपलब्ध आहे, त्यामुळे येथील शस्त्रक्रियेची अचूकता अधिक दिसून येते.
अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेची भूल देणे व इतर शस्त्रक्रियेसाठी भूल देण्यात महत्वाचा फरक असतो. इतर शस्त्रक्रियेत भूल दिल्यावर रुग्णास कोणत्याच संवेदना होत नाहीत, तो पूर्णपणे बेशुद्ध असतो. पण अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेमध्ये भूल देताना केवळ मेंदूच्या प्रमुख भागात भूल देवून केवळ तोच भाग भूलीत केला जातो. अशा शस्त्रक्रियेत रुग्णास बोलते ठेवून, आरामदायक स्थिती शस्त्रक्रिया संपेपर्यंत ठेवावी लागते, हे कौशल्य व कसब केवळ न्युरो भूलतज्ञांच्याकडे असते, सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रकाश भरमगौडर हि जबबदारी गेली १० वर्ष यशस्वी सांभाळत आहेत. याशिवाय शस्त्रक्रिया चालू असताना इतरत्र मेंदूच्या इजा होऊ नये म्हणून सिद्धगिरी येथे उपलब्ध न्युरो मॉनेटरिंग मशीन उपलब्ध आहे. या प्रणालीमुळे मेंदूचा भागाचे नुकसान होऊ न देता शस्त्रक्रिया करणे सुलभ होते.
यावेळी बोलताना पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, “फंक्शनल एम.आर.आय., ट्रॅक्टोग्राफी तंत्रज्ञान, न्युरो नेव्हीगेशन मशीन, न्युरो मॉनेटरिंग प्रणाली सह अनुभवी न्युरो शस्त्रक्रिया तज्ञ, अनुभवी न्युरो भूलतज्ञ यांच्या पूर्णतेतून यशस्वी व सर्वोत्तम अशी अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वी होवू शकते. या सर्व गोष्ठीसह सिद्धगिरी येथे कुशल डॉक्टर्स व नर्सिंग टीम सतत उपचारांसाठी उपलब्ध असल्यामुळेच ग्रामीण भागात असून हि सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने १०२ अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केला आहे. अशा आरोग्य सेवांकरिता मेट्रो सिटीमध्ये जाण्याची आता आवश्यकता नाही, कारण मेट्रो सिटी मध्ये हि अशा उपकरणांसह शस्त्रक्रिया मोजक्याच प्रमाणात होतात. या प्रकारच्या शस्त्रक्रियेत शस्त्रक्रिया करताना रुग्ण बोलू शकतो, हात-पाय हालवू शकतो. कधी कधी तर रुग्ण काही प्रकारची वाद्य हि वाजवू शकतो. अशा वातावरणात शस्त्रक्रिया करण्याचे कसब व कौशल्य डॉ. शिवशंकर मरजक्के व त्यांच्या टीमकडे आहे म्हणून हा विक्रम केला आहे. मेट्रो सिटीमधील या निवडक रुग्णालयात विलंब करण्यापेक्षा रुग्णांना माहिती नसते कि, सिद्धगिरी सारख्या ग्रामीण भागात हि अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण सर्व प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीनी हि माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून गरजू रुग्णांना याचा लाभ व्हावा, असे आवाहन पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले.
यावेळी डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी विविध दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे सदर जटील व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. यावेळी प्रास्ताविक विवेक सिद्ध यांनी केले तर या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, ऋतुराज भोसले, दयानंद डोंगरे व पत्रकार उपस्थित होते.