बेळगाव : लग्नाला जात असलेल्या वृद्ध दाम्पत्याला पोलीस असल्याचे सांगून अडवून भरदिवसा त्यांचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना गणेशपूरजवळ घडली आहे. कोरवी गल्ली, जुने बेळगाव येथील रहिवासी गणपत रामचंद्र पाटील आपल्या पत्नीसह नातेवाईकांच्या लग्नाला बेळगुंदी येथे जात होते. त्यावेळी गणेशपुर येथे दोन युवकांनी गणपत पाटील यांची गाडी अडवून आम्ही पोलीस आहोत, या भागामध्ये दोन दिवसांआधी गांजा प्रकरण झाले असून आम्ही इथे तपासणी करत आहोत, तुमच्या गाडीची तपासणी करायला हवी असे सांगून गाडीमधील साहित्य व गणपत यांच्या पत्नीच्या गळ्यातील अडीज तोळे वजनाचे गंठण, काळी मणी हार (श्रीमंत हार) जबरदस्तीने काढायला लावले व तुमच्या रूमालमध्ये बांधून गाडीमध्ये ठेवतो असे सांगून ते दागिने घेऊन पलायन केले असे गणपत पाटील यांनी सांगितले. अचानक झालेल्या या लुटीच्या घटनेने गणपत पाटील व त्यांची पत्नी भेदरली. त्यांनी रडतच आपल्यावर कोसळलेल्या प्रसंगाची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. यावेळी गणेशपुर येथे जमलेल्या लोकांनी कॅम्प पोलीस ठाण्याला संपर्क करून पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली व तक्रार नोंदविण्यासाठी कॅम्प पोलिस ठाण्याला पाठविले. कॅम्प पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, पोलीस असल्याचे भासवून भरदिवसा केलेल्या या वाटमारीच्या घटनेने गणेशपूर भागात खळबळ आणि भीतीही माजली आहे. या लुटारूंना जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
