येळ्ळूर : 865 सीमावासीय शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या नियोजनाची बैठक येळ्ळूर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता उघाडे यांनी केले. 865 सीमावासीय गावातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची परिस्थिती बघता त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे चित्र आहे. मातृभाषा कन्नड नाही म्हणून नोकरीत त्यांना प्राधान्य नाही. आणि इंग्रजी तृतीय भाषा असल्याने त्यांची पुढे प्रगती होत नाही. अशा कोंडीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षेतूनच पुढे जावे लागणार आहे. अशा परीक्षांचा सराव दिल्यास त्यांना भविष्यात संधी मिळेल या हेतूने या स्पर्धा परीक्षेचे आयोजन होत असल्याचे यावेळी या मंचचे अध्यक्ष दशरथ सूर्यवंशी यांनी सांगितले. रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षा बेळगाव व खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी असून त्या तिसरी ते पाचवी व सहावी ते सातवी अशा दोन गटात होणार आहेत. त्यासाठी हिंडलगा हायस्कूल हिंडलगा, मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर व ताराराणी हायस्कूल मराठा मंडळ खानापूर अशा तीन केंद्रामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षा 12 ते 2 या वेळेत घेण्यात येणार आहे. या स्पर्धा परीक्षा तुम्ही आमच्या मुलांच्यासाठी आणल्या आहात, या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळणार आहे, तेव्हा या स्पर्धा परीक्षेसाठी जे जे सहकार्य लागेल ते निश्चितच आम्ही करू, असे आश्वासन चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी दिले.
यावेळी नवहिंद क्रिडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, दत्ता उघाडे, दुधाप्पा बागेवाडी, मुख्याध्यापक बबन कानशिडे, पी. वाय. गोरल, बी. एन. मजुकर, एस. बी. पाखरे, आदी यावेळी उपस्थित होते. आभार विनायक पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta