बेळगाव : शेतकरी हा सदैव सलाईनवरच असतो अशीच परिस्थिती सतत निर्माण झालेली आहे. कारण अतिवृष्टीने दुबार पेरणी लागली. त्यात ऐन बहरात आलेल्या भातपीकांवर करपा रोग पडल्याने उतार कमी तर झालाच. पण आता भातपीकाला गेल्यावर्षीपेक्षा क्विंटलला 1000/1500 रु. भाव कमी झाल्याने मशागत खर्च वाढल्याने कसा ताळमेळ बसवावा यात शेतकरी सापडलाय. या भागात जवारी मसूर जी बाजारात 250/300 भावाने विकली जाते ती रब्बी हंगामात पेरतात. तीला विमा सुरक्षा नाही. पण आता खराब हवामानाने मसूरवर मर रोग सुरु झाल्याने शेतकरी पेरलेलं बी तरी मिळेल कि नाही या चिंतेत आहे. सरकारची भरपाई तर धन्यास कण्या, चोरास मलिदा अशीच आहे. आमच्याकडील जवारी मसूर, जवारी हिरवा वाटाणा, जवारी मोहरीला विमा कवच नाही. इतर पीकं असतात पण ज्या भागात जी पीकं असतात त्यानां विमा कवच दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पण सरकारला तेवढी मानसिकता हवी. येथील मसूर पीकं मरत असल्याने शेतकरी अत्यंत अडचणीत सापडला आहे. एकिकडे सरकारच दुर्लक्ष तर दुसरीकडे हवामानाची साथ नाही. म्हणजे दोहोबाजूनी संकटात सापडलेला शेतकरी तरणार कसा? म्हणून प्रत्येक शेतकरी शेतातील मरणारी पीकं अक्षरशः रडतोय.