
बेळगाव : येथील धर्मवीर संभाजी चौक अनगोळ येथे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य आणि दिव्य अशा त्याबरोबरच उत्तमरित्या सुशोभित केलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दिनांक 5 रोजी महाराष्ट्राचे मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज शिवराजेंद्र महाराज भोसले यांच्या उपस्थितीत आमदार अभय पाटील, महापौर सविता कांबळे, माजी महापौर आनंद चव्हाण यांच्यासह हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आजचा पुतळा अनावरण सोहळा वादातीत होता. शासनाच्या वतीने हा सोहळा आज करण्यात येऊ नये अशी तयारी करण्यात आलेली होती तर दुसऱ्या बाजूला आजच या पुतळ्याचे उद्घाटन करायचे असे ठरविण्यात आलेले होते. महापालिकेच्या वतीने हा पुतळा उभारण्यात आलेला असल्यामुळे महापौर सविता कांबळे यांनी आणि उपमहापौर आनंद चव्हाण या दोघांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवल्यामुळे अनावरण सोहळा पूर्ण झाला. दुसऱ्या बाजूला शासकीय पातळीवर पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे असे ठरविण्यात आलेले होते. पण त्याची फिकीर न करता आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखालीच या पुतळ्याचे उद्घाटन झाले. महापालिकेमध्ये भाजपाचे वर्चस्व असल्यामुळे आजचा हा अनावरण सोहळा पार पडला. अनावरण सोहळ्यासाठी हजारो नागरिक, स्त्रिया उपस्थित होत्या.
शोभा यात्रा
संध्याकाळी सातच्या सुमारास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अनगोळ नाका या ठिकाणी आगमन झाले. त्या ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.
अनगोळ ग्रामस्थ आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचा विरोध
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे अनावरण सोहळा लांबणीवर टाकावा अशी मागणी करत काही दिवसांपासून श्रीराम सेना हिंदुस्थान ग्रामस्थ आणि काही पंचांनी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अनावरण सोहळा लांबणीवर टाकला होता. पण रविवारी पोलीस बंदोबस्तात अनावरण सोहळा होत असल्यामुळे श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कुरबर गल्ली कोपऱ्यावर जोरदार घोषणाबाजी करून विरोध केला. उपायुक्त शेकऱ्याप्पा यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना माघारी धाडले. त्यामुळे किरकोळ वादावादी वगळता पुतळा अनावरण शांततेच झाले.

Belgaum Varta Belgaum Varta