बेळगाव : पुणे येथील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट या संस्थेमधील प्राध्यापिका डॉक्टर मेधा दुभाषी यांनी सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जेष्ठ संचालक श्री. अभय याळगी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाह सुनीता मोहिते, संचालक प्रसन्न हेरेकर आणि व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर हेही यावेळी उपस्थित होते. डॉक्टर दुभाषी यांनी बेळगावातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पूर्वी त्यांचे वडील पी. आर. दुभाषी हे बेळगावचे कमिशनर असताना त्यांचे एक व्याख्यान बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेमध्ये त्यांनी गुंफले होते. त्यांचे वाचनालयाशी घनिष्ठ संबंध होते. त्यावेळेला मेधा दुभाषी याही वडिलांसमवेत वाचनालयाला यायच्या. मेधा दुभाषी या सध्या जागतिक पातळीवर महिला सक्षमीकरणाचे कार्य करतात. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये भाग घेऊन आपले शोधनिबंध सादर केले आहेत. देशातील विविध संस्थांमधील महिला व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास करून त्यांनी मौलिक निष्कर्ष काढले आहेत. याप्रसंगी कार्यवाह सौ. सुनीता मोहिते यांनी त्यांचे आभार मानले.