बेळगाव : आनंदनगर, दुसरा क्रॉस वडगाव येथील पिण्याच्या पाण्याची जुनी पाईप लाईन बदलून त्या ठिकाणी नवी मोठ्या आकाराची पाईपलाईन घालावी जेणेकरुन पाणी पुरवठा सुरळीत होऊन नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशा मागणीचे निवेदन स्थानिक रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे महापौर मंगेश पवार यांच्याकडे दिले.
आनंदनगर, दुसरा क्रॉस वडगाव येथील रहिवासी प्रतिमा संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन महापौरांच्या गैरहजेरीत उपमहापौर विणा जोशी यांनी स्वीकारले. तसेच आजच दुपारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आमची बैठक होणार आहे.
त्या बैठकीत तुमची मागणी मांडून तिची पूर्तता करून दिली जाईल असे आश्वासन उपमहापौर जोशी यांनी दिले. आनंदनगर दुसरा क्रॉस येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जुनी झाली असून ती केवळ 2.5 इंच व्यासाची आहे. पूर्वी 15-20 वर्षांपूर्वी या ठिकाणची लोकसंख्या कमी असल्यामुळे ही जलवाहिनी योग्य होती मात्र आता कालांतराने आनंदनगर दुसरा क्रॉस येथील लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. याबरोबरच पाईपलाईन जुनी झाली असल्यामुळे परिसरातील घरांना पिण्याचे पाणी व्यवस्थितरित्या येत नाही. नळाला पाणी कमी दाबाने येण्याबरोबरच बऱ्याच जणांना काही वेळा पाणीच मिळत नाही. त्यामुळे पाण्याविना प्रचंड हाल होत असल्याची आनंदनगर दुसरा क्रॉस येथील रहिवाशांची तक्रार आहे.
त्यासाठी जुनी पाईपलाईन बदलून त्या ऐवजी 4 इंची नवीन पाईपलाईन बसवून पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी प्रतिमा पवार यांच्या समवेत रोहिणी रामा जुवेकर, संतोष शिवाजी पवार आदी रहिवासी उपस्थित होते.