तारांगण, अखिल भारतीय साहित्य परिषद आणि जननी ट्रस्टच्या वतीने कर्तृत्वाचा कौतुक सोहळा उत्साहात संपन्न
बेळगाव (प्रतिनिधी) : आरोग्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस सतत व्यस्त असतो. मात्र, दैनंदिन कामांबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राजश्री अनगोळ यांनी व्यक्त केले. त्या तारांगण, अखिल भारतीय साहित्य परिषद आणि जननी ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित कर्तृत्वाचा कौतुक सोहळा या विशेष महिला सन्मान समारंभात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, “ध्यान, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि स्नेहसंबंध यांना जीवनात प्राधान्य दिल्यास आरोग्यदायी आनंद मिळतो. आपल्या नात्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे यांनीही आरोग्याविषयी महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “नव्या पिढीने निसर्गनियमांप्रमाणे जीवनशैली स्वीकारली पाहिजे. करिअरच्या मागे लागून उशिरा विवाह आणि उशिरा पालकत्व स्वीकारण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय, ऑनलाईन युगामुळे बहुतांश कामे मोबाईलद्वारे होत असल्याने शारीरिक हालचाली कमी होत आहेत. ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम केल्याने व्यायाम आणि फिरण्याकडे दुर्लक्ष होते, परिणामी स्थूलतेसारख्या समस्या वाढू लागल्या आहेत. याशिवाय, जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे सकस आहाराकडे दुर्लक्ष होऊन शरीरावर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे ताज्या भाज्यांपासून तयार केलेला संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.”
गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
कार्यक्रमात ८ महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. पतीच्या विश्वासाला सार्थ ठरवणाऱ्या वनिता बिर्जे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या शुभांगी पाटील, महिलांचे सबलीकरण करणाऱ्या सविता हेब्बार, सक्षम पालकत्व निभावणाऱ्या सुनीता बिर्जे, अंध विद्यार्थ्यांसाठी योगदान देणाऱ्या भाग्यश्री मुतगेकर, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समर्पित शिक्षिका सविता चंदगडकर, अपंग पतीचे जीवन फुलवणाऱ्या मनाली कुगजी आणि कराटे क्षेत्रात सुवर्णपदक विजेती ईश्वरी मंडोळकर यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दत्तप्रसाद गिजरे होते. यावेळी डॉ. मंजुषा गिजरे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे पाटील, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. मनीषा नाडगौडा यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. सरस्वती पूजन आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सुत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर रोशनी हुंदरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला लेखिका प्रतीक्षा प्रभू, स्मिता पाटील, प्रियांका धामणेकर, जयश्री पाटील, प्रतिभा सडेकर, सुधा माणगावकर, नेत्रा मेणसे, जयश्री दिवटे, सविता वेसणे, अर्चना पाटील, नयन मंडोळकर, अश्विन मांगले, बजरंग धामणेकर, गोपाळ बिर्जे, शंकर मुतगेकर, रामचंद्र कुगजी यांसह अनेक महिला आणि मान्यवर उपस्थित होते.