Friday , December 12 2025
Breaking News

६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात पार पडणार असून, या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाच्या गौरवार्थ त्यांची ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन अत्यंत यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या निवडीची अधिकृत घोषणा साहित्य परिषदेचे राजाध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण यांनी केली. तसेच, संमेलनाचे समीनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. याशिवाय, डॉ. संजय कळमकर (दुसरे सत्र) आणि जागर लोकसंस्कृतीचे शाहीर अभिजीत कालेकर (तिसरे सत्र) यांचे व्याख्यान होणार आहे. हे संमेलन ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे.

डी. बी. पाटील हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी शिक्षक, छायाचित्रकार, समाजसेवक आणि उत्कृष्ट वक्ता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगावचे अध्यक्षपद भूषवले असून, त्यांच्या कार्यकाळात ३१० हून अधिक सामाजिक प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले. ते बेळगाव फोटो आणि व्हिडिओग्राफी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तसेच राष्ट्रीय दैनिक ‘द हिंदू’चे प्रेस पत्रकार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांचा साहित्य, कला आणि समाजसेवा यांचा सुंदर मिलाफ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगावचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी कार्य करणाऱ्या ‘कुटुंब’ संस्थेत मोलाचे योगदान दिले आहे. तसेच, ६० वेळा रक्तदान करून समाजसेवेत योगदान देणारे ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.

६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन त्यांच्या स्वागताध्यक्षपदाच्या नेतृत्वाखाली अधिक भव्य आणि समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य व सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी मिळेल. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निवडीचे अभिनंदन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समिती कार्यकर्त्यांचे जाहीर आभार

Spread the love  बेळगाव : दिनांक आठ डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *