बेळगाव : 23 एप्रिल या जागतिक पुस्तक दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालय, गणपत गल्ली बेळगाव येथे भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक ऍड. आय. जी. मुचंडी आणि अभय याळगी यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्य मराठी विकास संस्था मुंबई या संस्थेतर्फे महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानातून विविध विषयावरील सुमारे 500 ग्रंथांची खरेदी करण्यात आलेली आहे. या ग्रंथांची मांडणी वाचनालयात करण्यात आली आहे.
हे प्रदर्शन ग्रंथालयात एक आठवडाभर वाचकांसाठी खुले राहणार आहे.
बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आय. जी. मुचंडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि अभय याळगी यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुचंडी यांनी “आपल्या वाचनालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत त्यामध्ये या नव्या विविध विषयावरील पुस्तकांची भर पडली आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे” असे मनोगत व्यक्त केले. तर “आज जागतिक पुस्तक दिन असून या पवित्र दिनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे “असे मत अभय याळगी यांनी व्यक्त केले.
वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर अध्यक्ष अनंत लाड यांनी मुचंडी व याळगी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
सूत्रसंचालन कार्यवाह सुनीता मोहिते यांनी केले. याप्रसंगी रघुनाथ बांडगी, लता पाटील, प्रसन्न हेरेकर यांच्यासह वाचनालयाचा कर्मचारी वर्ग व वाचक वर्ग उपस्थित होता. हे प्रदर्शन आठ दिवस होणार असल्याने वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले. संचालक नेताजी जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta