Tuesday , June 25 2024
Breaking News

कुसुमाग्रजांनी स्वतंत्र चळवळीत क्रांतिकारी दिले योगदान : साहित्यिका प्रा. डॉ. निता दौलतकर

Spread the love

बेळगांव : ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू. २७ फेब्रु १९१२ या दिवशी पुणे येथे त्यांचा जन्म झाला व १० मार्च १९९९ रोजी त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. त्यांचा जन्मदिवस अतिशय कृतज्ञतापूर्वक ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. इतका मोठा सन्मान त्यांना दिला जातो, कारण त्यांनी मराठी साहित्यात नुसतीच मोलाची भर घातली म्हणून नव्हे, तर आपल्या मातृभाषेला उचित सन्मान मिळावा म्हणून अविरत जनजागरण केलं. उपेक्षित वनवासी बांधवांची प्रत्यक्ष सेवा केली आणि असंख्य अनाम वंचितांचा ते आधार झाले.
**माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
तिच्या संगाने जागल्या
दऱ्यायाखोऱ्यातील शिळा**

अशा शब्दांत कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राचा गौरव केला. ‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. परंतु अवघ्या मराठी रसिकांनी त्यांना मानाने अभिवादन केले ते ‘विशाखा’ या संग्रहापासून. १९४२ साली म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ‘चले जाव!’ सारख्या स्वातंत्र्य-चळवळीच्या झंझावाताच्या प्रहरात ‘विशाखा’ एखाद्या पलित्यासारखी हाती आली. अवघ्या समाजावर या कवितांनी अक्षरशः गारुड केले. युवकांच्या धमन्यांतून राष्ट्रप्रेमाचे रसायन जागृत करण्याचे सामर्थ्य कुसुमाग्रजांच्या शब्दांत होते. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार’ ‘अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!’ असे आवाहन करीत या कवितेने अक्षरशः रान जागे केले. स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला सज्ज असलेल्या क्रांतिकारकांचा स्वर कुसुमाग्रजांच्या प्रत्येक शब्दातून पलित्यासारखा धगधगत होता. मराठी भाषेचे तेज या शब्दांत होतेच; पण त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी बलिदान करण्यास सज्ज असलेल्या योद्ध्यांचे तेज निर्माण होते. ‘विशाखा’मधील ‘क्रांतीचा जयजयकार’ कवितेतील अनेक ओळी ह्या जगण्याची सुभाषिते झाल्याअसे प्रतिपादन कर्नाटक विश्वविद्यालय धारवाड येथील साहित्यिका प्रा. डॉ. निता श्रीकांत दौलतकर यांनी “वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे जीवनकार्य : क्रांतिकारी योगदान” या विषयांवर व्याख्यानात त्या बोलत होत्या.

एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे शाखा बेळगाव आणि रान फिल्म प्रॉडक्शन्स सामाजिक संस्था बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने ” जागतीक अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (21फेब्रुवारी), मराठी भाषा गौरव दिन (27 फेब्रुवारी), आणि राष्ट्रीय विज्ञान ( 28 फेब्रुवारी ) यांचे औचीत साधून  कर्नाटक विश्वविद्यालय धारवाड येथील साहित्यिका प्रा. डॉ. निता श्रीकांत दौलतकर यांनी “वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे जीवनकार्य : क्रांतिकारी योगदान” या विषयांवर व्याख्यान सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 6:00 वाजता शहापूर बेळगांव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगावचे माजी नगरसेवक श्री. अनिल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांवचे पुणे येथे वास्तवास राहणारे कलाकार श्री. विनोद पावशे, साहित्यिका प्रा. डॉ. निता श्रीकांत दौलतकर, प्रा. अशोक आलगोंडी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत साहित्यीक, कलावंत, समाजसेवक, खेळाडू यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

स्वागत कवी चंद्रशेखर गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक समाजसेवक प्रा. नारायण पाटील यांनी केले. परिचय निखिल भातकांडे व सागर गुंजिकर यांनी करून दिला. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला; याप्रसंगी साहित्यिका प्रा. डॉ. निता श्रीकांत दौलतकर, माजी नगरसेवक श्री. अनिल पाटील, अशोक आलगोंडी यांनी विचार मांडले. श्री. विनोद पावशे यांनी नटसम्राट नाटकातील विविध संवाद त्यांनी हुबेहूब करून दाखविली.
सूत्रसंचालन प्रा. निलेश शिंदे यांनी केले. तर सुधिर लोहार यांनी आभार मानले.

यावेळी आशा दौलतकर, श्रीकांत दौलतकर, एस. एल. गुंजिकार, नागराज पाटील, सई दौलतकर, आनंद गोरल, विशाल दौलतकर, लक्ष्मण बांडगे, गुरुसिद्धय्या हिरेमठ, आदिती दौलतकर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक, शिक्षवृंद, विद्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भाजपा उत्तर विभागाच्यावतीने लसीकरण मोहिम

Spread the love  बेळगाव : भारतीय जनता पक्ष उत्तर विभागाच्या वतीने बुथ पातळीवर डेंग्यू आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *