
बेळगाव : येत्या 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नड सक्ती विरोधात महामोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चाची धास्ती कर्नाटक प्रशासनाने घेतली असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले होते. चर्चे दरम्यान प्रशासनाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सदर मोर्चा न काढण्याची सूचना केली. असता मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचनेला न जुमानता आपल्या निर्णयावर ठाम राहत कोणत्याही परिस्थितीत 11 ऑगस्ट रोजी मराठी भाषिकांचा मोर्चा होणार असल्याचा ठाम निर्णय घेतला. प्रशासनाशी चर्चा करत असताना मध्यवर्ती पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, कर्नाटक प्रशासन बेकायदेशीररित्या सीमा भागात कन्नडसक्ती राबवित आहे त्या विरोधात दाद मागणे हा आमचा हक्क आहे. प्रशासनाने कितीही आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील मराठी भाषिक मोर्चा काढणार व तो यशस्वी करणार असा निर्धार यावेळी समिती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
भेटी दरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. महेश बिर्जे, ऍड. अमर येळ्ळूरकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta