बेळगाव (वार्ता) : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे लिखित सीमालढ्यावर आधारित ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाला बेळगावसह सीमाभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुस्तक प्रकाशनापूर्वीच वातावरण निर्मिती झाली आहे.
हे पुस्तक प्रत्येक गावागावात शाखे -शाखेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार युवा सेना बेळगावच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकासंदर्भात युवासेना बेळगावच्या पदाधिकार्यांनी आज सोमवारी सकाळी पुस्तकाचे लेखक प्रा. आनंद मेणसे यांची भेट घेतली आणि पुस्तक प्रकाशनासाठी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना प्रा. आनंद मेणसे म्हणाले की, सध्या 20 वर्षावरील आणि 30 वर्षाखालील वयाचे तरुण सीमाप्रश्नाच्या चळवळीत दिसतात. आता सीमाप्रश्न सोडवणुकीचे अपेक्षा त्यांच्याकडूनच आहे. कारण पहिली पिढी संपत आली असून दुसरी पिढी थकत चालली आहे. तेंव्हा सीमा लढ्याचा झेंडा सध्याची युवा पिढीच पुढे घेऊन जाणार आहे. मी पहिल्या व दुसर्या पिढीत काम केले आहे. या दोन्ही पिढ्यांमध्ये कामगार आणि शेतकरी वर्ग बहुसंख्येने होता. आत्ताच्या पिढीत सुशिक्षित विद्यार्थी आहेत, हा गुणात्मक फरक आहे.
पूर्वी आंदोलनासाठी उद्यमबाग बंद केले जात होते. त्यामुळे कामगारांच्या स्वरूपात आंदोलनकर्ते मिळायचे. मात्र आता उद्यमबाग बंद करणे शक्य नाही, कारण तेथे कामगार वर्ग नाही. त्यामुळे भविष्यातील लढा विद्यार्थ्यांनी चालविला पाहिजे असे माझे प्रांजळ मत आहे, असे प्रा. मेणसे म्हणाले.
यासाठी मराठी भाषिक युवा संघटनांनी प्रत्येक कॉलेजमध्ये आपली शाखा उघडली पाहिजे. 36 वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावल्यामुळे मला मराठी भाषिक मुलांचे अनेक प्रश्न माहित आहेत. ते सोडविले पाहिजेत. जोपर्यंत विद्यार्थी मोठ्या संख्येने चळवळीत येणार नाहीत, तोपर्यंत सीमा लढ्याला पुन्हा चालना मिळणार नाही. तथापि आजचा विद्यार्थी ये म्हंटल्यावर येणार नाही. तो कागदोपत्री पुरावा मागणार हे लक्षात घेऊन मी माझ्यापरीने या बाबतीत होईल तितके करावे म्हणून सीमा लढ्याचा इतिहास आणि त्याची माहिती देणारे हे पुस्तक लिहिले आहे, असेही प्रा आनंद मेणसे यांनी स्पष्ट केले.
यावेळी युवा सेनेचे विनायक हुलजी, निल तवनशेट्टी, विजय मोहिते, अद्वैत चव्हाण पाटील, वैष्णव जाधव व समितीचे सागर पाटील, रोहित बडमंजी आदी उपस्थित होते.
Check Also
स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण
Spread the love बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …