बेळगाव : अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांवर झालेल्या अन्यायावरील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकालात काढण्यात येतील, तसेच त्यांना न्याय देण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या जिल्हा जागृती आणि प्रभारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बोलत होते. पोलीस विभागाने अनुसूचित समाजाच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. गुन्ह्यांमध्ये पीडितांना कायदेशीर सल्ला दिला पाहिजे. आपण मानसिकदृष्ट्या आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांची स्मशानभूमी नाही, अशा गावांमध्ये स्मशानभूमीसाठी योग्य जागा ओळखून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी तहसीलदारांना दिल्या. चिक्कोडी, अथणी, रायबाग, निप्पाणी आणि कागवाड तालुक्यातील अनुसूचित जाती-जमातीची वस्ती असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमी मंजूर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या २ वर्षांपासून आरपीडी क्रॉसच्या नामांतराबद्दल करण्यात येत असलेल्या मागणीबद्दल विजय तळवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आरपीडी क्रॉसचे नामांतर वीर मदकरी असे करण्याचा आग्रह त्यांनी यावेळी केला. यावेळी कोणत्याही गोंधळाविना तातडीने आरपीडी क्रॉसचे नामांतर करण्यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. जिल्ह्यात अनुसूचित जमातींची संख्या मोठी आहे. बी.आर. आंबेडकर विकास महामंडळ आणि श्री महर्षी वाल्मिकी यांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना अनुसूचित जमातीच्या विकास महामंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व भौतिक उद्दिष्ट निश्चित करण्याची सूचना देण्यात आली. तसेच अनुसूचित समुदायासाठी स्मशानभूमी, बँक कर्ज, शिष्यवृत्ती आणि इतर सरकारी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वीच सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी, समाज कल्याण विभागाच्या सहसंचालिका उमा सालीगौडर, अतिरिक्त पोलीस वरिष्ठाधिकारी नांदगावी, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या संचालिका विद्यावती भजंत्री, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, डीसीपी रवींद्र गाडादि, अनुसूचित जाती आणि जमातीचे नामनिर्देशित सदस्य अशोक असोगी आदी उपस्थित होते.