बेळगाव : गेल्या 15 दिवसांपासून बेळगावात पाण्यासाठी हाहाकार सुरु आहे. पाणी पुरवठा खंडित झाल्याने शहरातील बसव कॉलनीतील रहिवाशांनी आज सकाळी-सकाळी एल अँड टी कंपनीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत महिला रस्त्यावर उतरल्या.
एल अँड टी कंपनीच्या विरोधात बसव कॉलनी रहिवाशांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला. बेळगावात उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. हिडकल डॅममध्ये भरपूर पाणीसाठा असूनदेखील एल अँड टी कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे पेटून उठलेल्या बसव कॉलनीतील रहिवाशांनी आज गुरुवारी बॉक्साईट रोडवर रिकाम्या घागरी ठेवून रास्ता रोको केला. पाणी पाहिजे अशा घोषणा देत एल अँड टी कंपनीच्या अधिकार्यांविरोधात शंख केला. रहिवाशांच्या आंदोलनामुळे बॉक्साईट रोडसह परिसरात ट्रॅफिक जॅम झाला.
निदर्शनात सहभागी झालेल्या बसव कॉलनीतील रहिवाशी उमा करजगीमठ यांनी बोलताना सांगितले की, एल अँड टी कंपनी आल्यापासून बेळगावात पाण्याची समस्या वरचेवर निर्माण होत आहे. सगळ्या अधिकार्यांना तक्रार अर्ज, निवेदने दिली आहेत. पण काही फायदा झालेला नाही. बसव कॉलनीतील पाण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा निघेपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा त्यांनी दिला.
24 तास पिण्याचे पाणी देऊ असा दावा अधिकारी करतात. पण प्रत्यक्षात पाणीच मिळत नाही अशी स्थिती आहे. बसव कॉलनी, वैभव नगर आदी परिसरात पाणी समस्या गंभीर झाली आहे. ती कायमची सोडवावी अशी मागणी एका महिलेने केली.
त्यानंतर बोलताना बसव कॉलनी रहिवाशी संघाचे अध्यक्ष कल्लप्पा गाणिगेरी म्हणाले, 2004 पासून आम्हाला पाण्याची समस्या जाणवत नव्हती. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून तीव्र पाणी समस्या उद्भवत आहे. गेल्या 15 दिवसांपासून तर पाणी समस्या बिकट झाली आहे. तक्रार देण्यासाठी फोन केल्यावर एकही अधिकारी फोन उचलत नाही. अधिकार्यांनी आता येथे येऊन पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले पाहिजे.
यावेळी वैभव नगरच्या एका रहिवाशाने सांगितले की, रात्री पाणी सोडतो, दुपारी पाणी सोडतो असे सांगून चालणार नाही. 24 तास पिण्याचे पाणी देऊ असा दावा अधिकारी करतात. त्यामुळे आम्हाला अखंड पाणी पुरवावे.
दरम्यान, घटनास्थळी एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी भेट देऊन निदर्शक रहिवाशांशी चर्चा केली. त्यावेळी रहिवाशांनी पाण्यासाठी आम्हाला तीनवेळा रस्ता रोखावा लागलाय. आज तिसर्यांदा रस्ता रोको करतोय. पण एल अँड टी कंपनीचे अधिकारी दखल घेत नाहीयेत असा आक्रोश व्यक्त केला.
यानंतर उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी एल अँड टी कंपनी अधिकार्यांना सोबत घेऊनच निदर्शनस्थळी भेट दिली. यावेळी संतप्त रहिवाशांनी अधिकार्यांना घेराव घातला. 15 दिवसांपासून वैभवनगर, बसव कॉलनीला पाणी पुरवठा केलेला नाही. 24 तास अखंड पाणी पुरवठा करावयाच्या या भागात साधा 2 ताससुद्धा पाणी पुरवठा केला जात नाही. विचारले तर विजेची समस्या, पंप खराब आहे अशी थातुरमातुर उत्तरे देता असे सांगत रहिवाशानाची अधिकार्यांना धारेवर धरले.
यावेळी रहिवाशांना उद्देशून आ. अनिल बेनके म्हणाले, शहराची पाणीसमस्या सोडविण्यासाठी एल अँड टीला 8 दिवसांची मुदत दिली आहे. त्याला 4 दिवस झालेत. येत्या 4 दिवसांत समस्या सोडवून सुरळीत पाणी पुरविले नाही तर मी बोलल्याप्रमाणे त्यांना झाडाला बांधून घालून दाखवतो. या भागाची पाणी समस्या लवकरच सोडवू असे आश्वासनही आ. बेनके यांनी दिले.
यावेळी एल अँड टी कंपनीचे मॅनेजर सुभाष म्हणाले, गेल्या 10 दिवसांपासून बेळगावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. टप्प्याटप्प्याने आम्ही ती सोडवत आहोत. या भागाला हिंडाल्कोहून पाणी येते. तेथील मोटर नादुरुस्त झाली होती. ती काल दुरुस्त केली आहे. त्यामुळे पाणी समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेऊ असे त्यांनी सांगितले.
