कर्नाटकातून एकमेव निवड : तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
निपाणी (संजय सूर्यवंशी) : बोरगाव (ता.निपाणी) येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांचे सुपुत्र अक्षय अनिल गुरव याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली. शनिवार 29 रोजी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे झालेल्या दीक्षांत समारंभात अक्षय गुरव यांची भारतीय सेनेत लेफ्टनंट पदी निवड झाली. यावेळी रिवीविंग अधिकारी लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कर्नाटक राज्यातून भारतीय सेनेत लेफ्टनंटपदी पदभार स्वीकारणारे एकमेव युवक असून बोरगाव शहरासह निपाणी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आपला मुलगा हा सैन्यदलात उच्चपदावर जावा व देशाची सेवा करावी, हे वडील अनिल गुरव व नूतन गुरव यांचे पहिल्यापासूनच स्वप्न होते. त्यामुळे आई- वडिलांनी लहानापासून अक्षयवर देशसेवेचे संस्कार दिले होते. या संस्कारामुळे अक्षय यांनी आई वडिलांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अक्षय याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहरातील अरिहंत मराठी शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर विज्ञान विभागात अकरावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण नंतर बेळगांव येथे पदवीपूर्णसाठी प्रवेश मिळवला. बीएस्सी शिक्षण घेत असताना एनसीसी मध्येही अक्षयने प्रवेश मिळवला. देशसेवेची आवड व राष्ट्र प्रेम यामुळे आपण सैन्यदलात दाखल व्हावे, यास वडील अनिल व आई नूतन यांचे प्रोत्साहन मिळाले. यामुळे अक्षय याने ध्येय निश्चित करून एसएसबी परीक्षेस बसला. देशभरातून 37 जण या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून अक्षय याचा मेरिटमध्ये 10 क्रमांक मिळविल्याने सैन्य दलातील लष्कर अधिकारी पदासाठी याची निवड झाली होती. चेन्नई येथील ट्रेनिंग दरम्यान जिद्द चिकाटी, जोरावर व आई वडिलांचे स्वप्न तसेच आपण देशासाठी काहीतरी केले पाहिजे, या हेतूने त्याने जिद्द मनाशी बाळगून कठोर प्रशिक्षण घेतले. आणि याच फळ म्हणून त्याचे भारतीय सेनेत लेफ्टनंट पदी अधिकारी म्हणून निवड झाली. वयाच्या 26 व्या वर्षी सैन्यदलात उच्च पदावर पोहचणारा शहरातील पहिला युवक असून त्याच्या या कामगिरीमुळे शहराचे नाव सातासमुद्रा पार पोहोचले आहे.
अक्षयच्या यशामागे वडिलांचे कष्ट, त्याचे ध्येय मोलाचे ठरले आहे. आजच्या युवकांनी स्पर्धात्मक युगाची जाणीव ठेवूनच विविध क्षेत्रातील पदाबाबत अभ्यास करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे आजच्या युवकांनी भारतीय सैन्य दलात नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे. कारण लष्करी विभागामध्येच आपणाला सन्मान व आदर मिळतो. 21 व्या वर्षापासूनच आपण अधिकारी बनू शकतो. उच्च ध्येय बाळगून वाटचाल केली तर आपणास यश नक्कीच मिळतेच त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, माझ्या या यशामागे आई-वडील शहरातील थोर मंडळी गुरुजन सहकारी मित्र यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले असे यावेळी अक्षय गुरव यांनी सांगितले.
माझा मुलगा सैन्यदलात उच्चपदावर जावा व देशसेवा करावी ही आमची ला पूर्वीपासूनच इच्छा होती. आणि ही इच्छा आज अक्षय यांनी सार्थ केले आहे याचा मला फार अभिमान आहे. आपला मुलगा काहीतरी केले पाहिजे हे प्रत्येक आईचे स्वप्न असते. या यशस्वी कामगारीबद्दल आम्हा दोघांनाही अभिमान वाटत असून त्यासाठी सहकार्य केले केलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते असे अक्षयची आई नूतन गुरव यांनी सांगितले.
दरम्यान अक्षय यांचे रविवारी शहरात आगमन होताच त्यांचे मित्र परिवार व कुटुंबियांकडून त्याचे कोरोनाचे नियम पाळत स्वागत करण्यात आले. वार्डातील अनेक महिलांनी औक्षण करून त्याचे स्वागत केले. तर अनेकांनी त्याचा सत्कारही केला.