बंधारे पाण्याखाली, दोन घरांची पडझड


चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात काल बुधवार दिवस रात्र व गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली आले आहेत, तर दोन ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच चंदगड-गडहिंग्लज मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद झाला. संततधार पावसाने चंदगड तालुक्यात जनजीवन विस्कळित झाले. गुरुवार साप्ताहिक बाजार असल्याने पावसाचा परिणाम चंदगड व कोवाड या दोन्ही ठिकाणी जाणवला. पावसामुळे कालकुंद्री येथील श्रीमती सुनंदा ज्योतीबा पाटील यांचे घर सकाळी कोसळल्याने एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही तर दाटे येथील दीपक गोपाळ वाळके यांच्या घराची भिंत पडून पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यातील हल्लारवाडी, कुर्तनवाडी, हिंडगाव, कानडी, सावर्डे, फितूर, भोगोली, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी हे बंधारे तसेच नरेवाडी लघु पाटबंधारा, पाण्याखाली आले आहेत. जंगमहट्टी, झांबरे, फाटकवाडी हे प्रकल्प क्षमतेने भरले आहेत संध्याकाळी पावसाने थोडी उसंत घेतली होती.