Saturday , July 27 2024
Breaking News

हत्ती आला पळा -पळा, अडकूर भागात हत्तीचे आगमन

Spread the love

तेऊरवाडी (संजय पाटील) : जंगलाने व्यापलेल्या चंदगड तालुक्यात सिंधुदुर्ग व कर्नाटक सीमेवर हत्तीचे वारंवार आगमन होत आहे. अनेकदा या हत्तींकडून प्रचंड मोठे नुकसान देखील केले जात आहे. आज तर या हत्तीचे अत्यंत गजबजलेल्या अडकुर, गणुचीवाडी, आमरोळी, केंचेवाडी परिसरात आगमन झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हत्तीला पाहण्यासाठी व घाबरूनही एकच पळापळ उडाली आहे.

अडकूर परिसरातील गणुचीवाडी गावामध्ये श्री. कोट यांच्या शेतात आज (शुक्रवार दि. २५ मार्च रोजी) सकाळी आठ वाजता हा एकच हत्ती घटप्रभा नदीच्या दिशेने जाताना दिसला. ऊसाची नुकतीच लागवड केलेल्या या शेतात अगदी हाकेच्या अंतरावरील हत्ती जात असल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच हा हत्ती अडकूर बंधाऱ्यालगत असणाऱ्या घटप्रभा नदीमध्ये अंघोळ करत असतानाची चित्रे व व्हीडीओ अनेक प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतली. या हत्ती नंतर घटप्रभा नदी ओलांडून पलीकडे गेला. शेतात हत्तीच्या पायांचे ठसे दिसून आले. अचानक आलेल्या या हत्तीने सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची भंबेरीच उडाली. तर अनेकांनी परिसरातील शेतकऱ्यांना सावध केले. सध्या हत्ती अमारोळी क्रशर मशिनच्या येथून केंचेवाडीच्या दिशेने निघून गेला तर थोड्या वेळाने पुन्हा अडकुरच्या दिशेने परतल्याची ताजी माहिती आहे. त्यामुळे लोकांचा वावर तसेच नवीन परिसरामध्ये आल्याने तो तिथेच फिरत असल्याचे दिसते.
हत्ती आल्याचे कळताच अडकुरसह परिसरात एकच गर्दी झाली होती. या घटनेने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र ऊसाची लागवड केलेली असून या हत्तीकडून ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील नागरिकातून होत आहे. घटनास्थळी वन विभाग लक्ष ठेवून आहे.

About Belgaum Varta

Check Also

चंदगड एस टी आगार व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस, प्रवाशांचे मात्र हाल

Spread the love  कोवाड : चंदगड एस टी आगारामध्ये आगार व्यवस्थापक, आगार प्रशासन व चालक वाहकामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *