ॲड. रवि रेडेकर यांच्या गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टकडून दौलत विषयावर लेखन स्पर्धा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : दौलत साखर कारखाना म्हणजे चंदगडी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आणि चंदगडी जनतेच्या अस्मितेचा विषय. अनेकांच्या लेखणीतून वेळोवेळी मांडला गेलेला एक ज्वलंत विषय…! अर्थात, दौलत साखर कारखान्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा त्याच्या प्रवासात नेमक्या कोणत्या घटना – घडामोडी व गमतीजमती घडल्या …? दौलत साखर कारखान्याचा चंदगडच्या समाजकारणावर , राजकारणावर आणि अर्थकारणावर नेमका काय परिणाम झाला…? दौलत साखर कारखान्याचा येथील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व येथील कष्टकरी जनतेला कितपत फायदा झाला…? या व अशा कित्येक प्रश्नांबाबत येथील युवापिढी ही आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. म्हणूनच दौलत साखर कारखान्याविषयी इत्यंभूत माहिती असणाऱ्या व त्याबाबत सखोल, सविस्तर आणि सडेतोड लेखन करणाऱ्या लेखकांसाठी ॲड. रवि रेडेकर गुरूकुलतर्फे या लेखन स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धांचा विषय आहे, दौलत साखर कारखान्याने चंदगडच्या जनतेला काय दिले…? स्पधेंसाठी पहिले बक्षिस २१ किलो साखर, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह. दुसरे बक्षिस ११ किलो साखर, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह. तिसरे बक्षिस ७ किलो साखर, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह. उत्तेजनार्थ १० जणांना प्रत्येकी १ किलो साखर, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियम व अटी
स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे, विषयाचे लेखन मराठी भाषेतच असावे, लेखनासाठी कुठलीही शब्दमर्यादा नाही, लेखन कागदावर एका बाजुला सुवाच्य हस्ताक्षरात किंवा टंकलिखित (टाईप केलेले) लिहिलेले असावे, स्पर्धकाने स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ( वॉट्स ॲप) स्पष्ट शब्दात लिहावा, स्पर्धेचा निकाल वॉट्स ॲपवर कळविणेत येईल, विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येईल.
परिक्षकांचा निकाल अंतिम राहिल. लेखन पाठविण्याचा पत्ता- ॲड. रवि रेडेकर, गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट, कोर्ट शेजारी, चंदगड ता – चंदगड, जि – कोल्हापूर (महाराष्ट्र) पिन -४१६५०९ . PDF फाईल्स असल्यास ८८८८७७६६२४/८८८८७७६६२५ या वॉट्सॲप क्रमांकावर ३१ जून २०२२ पर्यंत पाठवाव्यात.