चिक्कोडी : एसएसएलसी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आज चिक्कोडी शहरात 6 बोगस परीक्षार्थींना रंगेहात पकडण्यात आले.
राज्यभरात आज सोमवारपासून एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ झाला. चिक्कोडी शहरातही या परीक्षेला प्रारंभ झाला. मात्र आज पहिल्याच दिवशी चिक्कोडीतील एका केंद्रावर बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या वतीने परीक्षा देण्यास आलेल्या 6 बोगस परीक्षार्थींना रंगेहात पकडण्यात आले. शिक्षण खात्याचे अधिकारी हॉलतिकीट पडताळणी करताना हा गैरप्रकार आढळून आला. या प्रकरणी गोकाक तालुक्यातील गुडगेरी गावचा राहुल किळ्ळीकेतर, कोकणीवाडीचा भीमशी हुलीकुंद, बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील कोप्प एसके गावचा कार्तिक कुंबार, चिकलकोप्पचा सिद्दू महादेव जोगी, गिरसागरचा महांतेश संगप्पा डोळ्ळीनवर, बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी तालुक्यातील चिम्मड गावची सविता महादेव होसूर असे 6 बोगस परीक्षार्थी अधिकृत बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या वतीने परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यांना शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. चिक्कोडी पोलिसांची घटनास्थळी भेट देऊन त्यांची चौकशी केली व ताब्यात घेतले.
