खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर न्यायालयात प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालय व राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्यावतीने तालुका स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खटले आहेत यासाठी खानापूर न्यायालयात बृहत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा वकीलांनी तसेच पक्षकारानी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर न्यायालयाचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश मुरलीमोहन रेड्डी यांनी केले.
प्रारंभी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड आय. आर. घाडी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी न्यायालयाचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश मुरलीमोहन रेड्डी म्हणाले की, कोरोना काळात न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. प्रलंबित खटले लोकअदालतीत चालविण्यात येणार असुन अपघात, वाटणी, जनन मरन, बॅंक, सोसायटीचे धनादेश न वटणे, यासारखे खटले निकालात काढण्यात येणार आहेत. यावेळी परराज्यातील पक्षकारानी झूम ऍप, व्हाॅटसऍप काॅलिंगच्याव्दारे लोकअदालतीत सहभागी होता येत असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी लोकअदालतीत ३५० हून अधिक खटले निकालात काढण्यात आले. लोकअदालतीत निकाल दिलेल्या प्रकरणावर अपील करण्याची सोय नसल्याने जलद न्यायदानाचा लाभ मिळणार आहे. तेव्हा अधिकाधिक पक्षकारांनी यासंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
सोमवार दि. ५ पासून कामकाज पूर्वपदावर चालु राहिल तसेच कोरोनामुळे अद्यापही एका दिवसाला तीस खटले चालवण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.
यावेळी ऍड. आर. एन. पाटील, ऍड. गजानन देसाई, ऍड. मदन देशपांडे, ऍड. हिरेमठ, ऍड. प्रकाश बाळेकुंद्री, ऍड. इर्शाद नाईक, आदी उपस्थित होते.
