खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी बेळगांव येथे महामेळाव्याच्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करत त्यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. याचे पडसाड सीमाभागात पसरले असून मंगळवारी खानापूर शहरासह तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले.
मंगळवारी पहाटेपासून शहरात बंदचे वारे वाहू लागले. सकाळी आठ वाजल्यापासून खानापूर शहरातील शिवस्मारकापासून बाजारपेठेत व्यापार्यांनी सर्व दुकाने बंद ठेवून खानापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी शिवस्मारक चौकातील सभागृहात निषेध सभाचे आयोजन करून महामेळाव्याच्या दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करून काळी शाई फेकली. हे कृत्य करणे लोकशाहीचा अपमान करणे होय. यावेळी पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावले नाहीत. यामुळे मराठी भाषिकांचा अन्याय केला सारखा आहे, अशी मते खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी व्यक्त केली.
यावेळी बंद पाळून भ्याड हल्ल्याचा निषेध करत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना निवेदन सादर केले.
