खानापूर : लवकरच उद्घाटन होणाऱ्या खानापूर येथील नूतन बस स्थानकावर मराठी फलकाना स्थान द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच याबाबत बुधवारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
खानापूर येथे नवीन बस स्थानक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर बस स्थानकावर फक्त कन्नडमधुन मजकूर लिहिला जात आहे. त्यामुळे मराठी भाषकांची अडचणी निर्माण होणार असल्याने मराठीतून फलक लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले.
खानापूर बस डेपो व्यवस्थापक महेश तिरकन्नवर यांनी निवेदनाचा स्वीकार केला तसेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून मराठीतून फलक लावण्याचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, खजिनदार संजीव पाटील, ऍड. अरुण सरदेसाई, मध्यवर्ती समितीचे सदस्य गोपाळ पाटील, रमेश धबाले, पुंडलिक पाटील, मुकुंद पाटील, नागेश भोसले, अभिजीत सरदेसाई, संदेश कोंडवाडकर, प्रभू कदम, भास्कर पाटील आदी उपस्थित होते.
——————————————————————-
प्रतिक्रीया
संपूर्ण मराठी बहुल असलेल्या खानापूर तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी मराठी भाषेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र जाणीवपूर्वक मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे त्यामुळे तालुका रुग्णालय, बस स्थानक आणि इतर ठिकाणी मराठीतून फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. परंतु योग्य तो निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
आबासाहेब दळवी, सरचिटणीस, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती
——————————————————————–
गेल्या काही दिवसांपासून खानापूर येथे उभारण्यात येत असलेल्या सरकारी रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील मराठी भाषेतून फलक लावावेत तसेच सर्व प्रकारची माहिती मराठी भाषेतून देण्यात यावी यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. महेश कवीदासन्नावर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले तसेच लवकर मराठी फलक लावण्याची मागणी करण्यात आली.