खानापूर : कोणतेही ज्ञान मातृभाषेतून नैसर्गिक आणि सहजरितीने देता येते. मातृभाषेतील ज्ञानामुळेच माणसाची समज विकसित होते. माणसाच्या मेंदूचा नैसर्गिक विकास होण्यास मदत होते. मुलांना मातृभाषेऐवजी अन्य भाषेतून शिकविणे ही मेंदूची वाढ व विकास थांबविणारी प्रक्रिया आहे, असे प्रा. रंगनाथ पठारे यांनी स्पष्ट केले.
शिवस्वराज फाऊंडेशन आणि गुंफण साहित्य अकादमीतर्फे आयोजित २० वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन रविवारी (दि. २२) येथील लोकमान्य भवनात झाले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, बेळगाव-खानापूर सीमाभागाचा हा परिसर निसर्गाने नटलेला असून, रमणीय व सुंदर आहे. पण, याच सौंदर्यामुळे सीमावासीयांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्ये या भागावर दावा करीत असून, त्यात अनेक पिढ्यांचे नुकसान झाले. सीमाप्रश्न ही भळभळती वेदना असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र सरकारच्या अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.
टाळ व मृदंगांची लाभलेली साथ, अभंगांचा गजर आणि मराठीच्या संवर्धनाची हमी देत आकर्षक फलक घेऊन सहभागी झालेले विद्यार्थी अशा मराठमोळ्या वातावरणात शहरातून काढण्यात आलेली ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. गुंफण सद्भावना साहित्य संमेलनानिमित्त चिरमुरकर गल्ली येथील ज्ञानेश्वर मंदिरापासून ग्रंथ दिंडीला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. स्टेशन रोड, शिवस्मारक चौक, बेळगाव गोवा महामार्गे संमेलन स्थळ लोकमान्य भवन पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली.
अग्रभागी विविध शाळांचे विद्यार्थी मराठी भाषा आणि शाळांच्या संवर्धनाचा संदेश देणारे घोषणा फलक घेऊन सहभागी झाले होते. त्यांच्यापाठोपाठ अभंग गायनात रममान झालेले बारकरी व महिला सहभागी झाल्या होत्या. ग्रंथदिंडीच्या मार्गावर भगव्या पताका आणि भगवे ध्वज लावण्यात आले होते.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. रंगनाथ पाठारे पुढे म्हणाले, वास्तविक भाषा आणि साहित्याच्या निवाऱ्यात राहून व्यवहार करायचा असतो. परंतु, सीमाभागात निवाऱ्याबाहेर राहून व्यवहार करावा लागत आहे. मातृभाषेवर अनन्वित अन्याय होत आहे. तो केवळ मराठी भाषेवर होतोय असे नाही तर कमी-अधिक प्रमाणात कानडीवरदेखील त्याचा परिणाम होत आहे. इंग्रजीचे फॅड पसरले आहे. मातृभाषेऐवजी इंग्रजीतून शिक्षण घेणारी पिढी समाजापासून तुटत आहे. या पिढीचे भविष्यच कोमेजून जात आहे, असे त्यांनी सांगितले. साहित्य मूल्याचा संस्कार करते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी वापर करण्याचे आत्मबळ साहित्य मिळवून देते. आदरभाव व मानवता ही मूल्ये आपल्यात साहित्यामुळे रुजली आहेत. साहित्य समाजाला जागृत करते. आपल्या जगण्यातील प्रश्न हेच साहित्याचे विषय आणि प्रश्न असायला हवेत. सामाजिक व भावनिक आशयांनी नटलेल्या एका पेक्षा एक दर्जेदार कवितांच्या सादरीकरणाने निमंत्रितांची काव्य मैफिल खानापूरकरांच्या चांगलीच स्मरणात राहिली. कवयित्री रजनी रायकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या सत्रात झालेल्या कवी संमेलनात सहभागी सर्वच कवींनी दमदार सादरीकरण केले.
प्रारंभी स्वागताध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी स्वागत केले. डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविक केले. संमेलनस्थळाला दिवंगत उदयसिंह सरदेसाईनगरी तर विचारपिठाचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर माळगावकर व्यासपीठ असे नामकरण करण्यात आले होते. सुरुवातीला शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिर ते संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर निमंत्रित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. साहित्यिक संजीव वाटुपकर व सुजीत शेख यांनी सूत्रसंचालन केले.