पणजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोव्यातील पणजी येथे काँग्रेसतर्फे ‘जय बापू जय भीम जय संविधान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण करताना सांगितले की, आज महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी संविधानाच्या रक्षणासाठी, गरीबांच्या कल्याणासाठी, आणि प्रत्येक घरापर्यंत न्याय पोहचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेऊया. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करणे, त्यातील घटनात्मक मूल्यांची जपणूक करणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे, ही काँग्रेस पक्षाची कायमची बांधिलकी राहिली आहे. सर्व जातीधर्मांतील लोकांना समता आणि न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सतत लढत आला आहे आणि पुढेही लढत राहील.
या कार्यक्रमाला गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते, जिल्हाध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.