Monday , April 20 2026
Breaking News

कर्नाटक काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी चुरस; बजेटनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

Spread the love

 

बंगळूर : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी ‘पहिल्यांदा निवडून आलेल्यांना मंत्रिपद नाही’ असे विधान केल्यानंतर राज्य काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून आपली क्षमता सिद्ध करावी, या भूमिकेतून अनेक आमदार मंत्रिपदासाठी पुढाकार घेत असून, दिल्ली दरबारात तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे काही आमदार सज्ज झाले आहेत. त्यानुसार काही जणांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे.

राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाच्या ‘पॉवर शेअरिंग’ वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्नशील झाले आहेत. दररोज नवे आमदार दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना भेटून “आम्हालाही संधी द्या” अशी मागणी करत असल्याचे समजते.

विधानपरिषदेचे सदस्य आणि पक्षाचे सचेतक सलीम अहमद हेही या संदर्भात दिल्लीला रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमदारांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवला आहे. एआयसीसी अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, काँग्रेस नेते के. वेणुगोपाल आणि रणदीपसिंर सुरजेवाला यांची भेट घेऊन इच्छुक आमदार आपली मागणी मांडत आहेत.

दरम्यान, विधानपरिषदेचे सदस्य बी. के. हरिप्रसाद यांनीही मंत्रिपदाची उघड मागणी केली आहे. त्यांनी सोनिया गांधी, मल्लीकार्जून खर्गे आणि राहूल गांधी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच एमएलसी सलीम अहमद, एमएलसी राजेंद्र आणि अजय सिंग यांनीही स्वतंत्रपणे पक्षश्रेष्ठींकडे मंत्रिपदासाठी मागणी नोंदवली आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांची फेब्रुवारी २७ रोजी बंगळुरातील एका खासगी हॉटेलमध्ये गुप्त बैठक व मेजवानी झाल्याची चर्चा आहे. मागडीचे आमदार एच. सी. बालकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या बैठकीला सुमारे ३० ते ४० आमदार उपस्थित होते, अशी माहिती आहे. ही बैठक मुख्यमंत्रीपदासाठी डी. के. शिवकुमार यांच्या समर्थनार्थ लॉबिंगसाठी होती, अशीही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे काही आमदार मंत्रिपदासाठी दिल्लीमध्ये पाठपुरावा करत आहेत.

मुख्यमंत्री सिध्दरामय्या ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *