बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीत गटाचे राजकरण होत असल्याने दोन दोन समितीच्या बैठका होत आहेत. हे थांबण्यासाठी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या अध्यक्ष या नात्याने खानापूरात एकीची वज्रमुठ बांधण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. याशिवाय समितीला बळकटी येणार नाही. एकी झाली तरच येणाऱ्या तालुका, पंचायत जिल्हा पंचायत निवडणूकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यशस्वी होईल अन्यथा राष्ट्रीय पक्ष आम्हाला जागा देणार नाही. यासाठी दोन्ही गटाला एकत्र आणण्यास माझा प्रयत्न राहिल. तो यशस्वी करीन असा विश्वास बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी खानापूरात कोरोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलताना व्यक्त केला.
सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तालुका एकीकरण समिती अध्यक्ष व माजी आमदार दिगंबर पाटील होते. तर किरण गावडे, मदन बामणे, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर, चिटणीस आबासाहेब दळवी, महादेव घाडी, विवेक गिरी आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविक चिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. यशवंत बिर्जे यांनी स्वागत केले.
यावेळी कोरोना योध्दे टागर ग्रुप, श्रीराम सेना, बजरंग दल तसेच बेळगावच्या कोरोना योद्ध्यांचा पाहुण्याच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रविण पाटील गर्लगुंजी, जयराम देसाई, श्रीकांत कदम, अर्जून देसाई, किरण गावडे, मदन बामणे आदींनी विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की, सर्वानी समितीच्या एका झेंड्याखाली येण्यासाठी माझा प्रयत्न आहे. केवळ निवडणूकीच्या उमेदवारीसाठी येणे कदापि शक्य नाही. शिवाय एकदा आमदारकी भोगलेल्याना पुन्हा उमेदवारी लाभणार नाही असे सडेतोड सांगतो. सर्वानी पुन्हा एकत्र येऊन समितीची एकी, मराठी भाषा टिकविण्यासाठी वाटेल ते करायला माझी तयारी आहे, असे सांगितले.
सत्कार सोहळ्याला आजी-माजी प्रतिनिधी, समितीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार महादेव घाडी यांनी मानले. तर सुत्रसंचालन वासुदेव चौगुले यांनी केले.
Check Also
म. मं. ताराराणी पदवीपूर्व कॉलेजची कुमारी साधना होसुरकर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात…
Spread the love खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या विद्यालयातील …