
खानापूर : मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल, खानापूर येथे २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात, आनंदी वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडेचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा हा क्रीडा महोत्सव उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
स्पर्धांची सुरुवात नेत्रदीपक पथसंचलन परेडने करण्यात आली. शाळेतील रेड, ब्लू, ग्रीन व येल्लो या चारही संघांनी एकसंध पावलांतून शिस्त, आत्मविश्वास, संघभावना व देशप्रेमाचे प्रभावी दर्शन घडवले. त्यानंतर सरस्वती मातेचे पूजन, दीपप्रज्वलन व ध्वजारोहण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. ईशस्तवन व स्वागतगीताने संपूर्ण परिसर मंगलमय व उत्साहपूर्ण झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या क्रीडा शिक्षिका ए. टी. पाटील यांनी केले. क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जिद्द, नेतृत्वगुण, पराभव स्वीकारण्याची मानसिकता आणि विजयाचा सन्मान करण्याची वृत्ती निर्माण होते, असे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.
या क्रीडा दिनाच्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन. जाधव यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून जीवन घडवणारी शाळा आहे. खेळातून शरीर सुदृढ होतेच, पण त्यासोबत संयम, चिकाटी, आत्मविश्वास, संघभावना आणि जीवनातील चढउतारांना सामोरे जाण्याची ताकद प्राप्त होते. शिक्षणाबरोबर क्रीडेला योग्य स्थान दिल्यासच विद्यार्थिनींचा खरा सर्वांगीण विकास साध्य होतो, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव एस. पाटील, बेळगाव येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सदानंद बी. बस्तवाडकर, आर्किटेक्ट विनायक एम. मुतगेकर, मराठा मंडळ ताराराणी पी. यू. कॉलेजचे प्राचार्य अरविंद एल. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आर्किटेक्ट विनायक एम. मुतगेकर यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतातून विद्यार्थिनींना उद्देशून सांगितले की, खेळातून मिळणारी जिद्द व शिस्त आयुष्यभर साथ देते. यशासाठी अपयश पचविण्याची कला, सातत्य आणि आत्मविश्वास या गुणांची पायाभरणी क्रीडाक्षेत्रातच होते. विद्यार्थिनींनी अभ्यासासोबत खेळातही प्रावीण्य मिळवावे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
तसेच सदानंद बी. बस्तवाडकर यांनी आपल्या मनोगतातून या मुलींच्या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. विद्यार्थिनींना दर्जेदार सुविधा, क्रीडासाहित्य व प्रोत्साहन मिळावे यासाठी आपण नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिल्याने उपस्थितांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एल. आर. पाटील यांनी अत्यंत प्रभावी व प्रसंगानुरूप केले, तर आभार प्रदर्शन व्ही. एस. मुन्नोळकर यांनी केले. त्यानंतर वार्षिक क्रीडा स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन करून विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांना उत्साहात सुरुवात करण्यात आली.
एकूणच हा क्रीडा दिनाचा सोहळा विद्यार्थिनींच्या अंगी क्रीडासंस्कृती रुजवणारा, आरोग्य, शिस्त, जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती जागवणारा ठरला.
Belgaum Varta Belgaum Varta