Monday , April 6 2026
Breaking News

हलशी-हलशीवाडीत लक्ष्मीदेवी यात्रोत्सव बुधवारपासून

Spread the love

 

खानापूर : तालुक्यातील हलशी-हलशीवाडी येथे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी यांच्या यात्रोत्सवाचे आयोजन तब्बल २८ वर्षांनंतर होणार आहे. बुधवारपासून (ता. ८) ते १६ एप्रिल या कालावधीत हा भव्य सोहळा संपन्न होणार असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रोत्सवाची सुरुवात बुधवारी (ता. ८) पहाटे ६ वाजून २३ मिनिटांनी अक्षतारोपणाने होणार आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून यात्रेला प्रारंभ केला जाईल. त्यानंतर मानकऱ्यांच्या ओट्या घेऊन सायंकाळी देवीचा मुक्काम श्री नरसिंह-वराह मंदिरात राहणार असून रात्री जागर सोहळा पार पडणार आहे. गुरूवारी (ता. ९) दुपारी २ वाजता श्री लक्ष्मीदेवी रथावर विराजमान होऊन भव्य रथोत्सवास सुरुवात होईल व सायंकाळी देवी गदगेवर विराजमान होऊन पारंपरिक विधी पार पडतील.

या यात्रोत्सवाला धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये योगी मोहननाथ महाराज, चन्नबसव देवरु, चन्नवीर देवरु यांच्यासह पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच माजी आमदार, विधान परिषद सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक नेते यांचा समावेश आहे.

यात्रोत्सव काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन केले असून भाविकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. १० एप्रिलला प्राचार्य गणेश शिंदे (पुणे) यांचे प्रेरणादायी प्रवचन, ११ एप्रिलला लोकप्रिय कन्नड नाटक ‘संग्या बाळ्या’, १२ ला कोल्हापूर येथील भव्य ऑर्केस्ट्रा, १३ ला दुपारी ३ वाजता पारंपरिक कुस्ती आखाडा व रात्री ओपन डान्स स्पर्धा, १४ ला सकाळी ओटी भरणे, ठगरांची झुंज शर्यत (नरशेवाडी माळ) व रात्री हुबळी ऑर्केस्ट्रा, १५ ला दुपारी आंबली गाडे स्पर्धा व रात्री रिया पाटील यांचा संगीत-नृत्य कार्यक्रम व १६ एप्रिलः संध्याकाळी देवीचे सीमोल्लंघन व यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

जवळपास तीन दशकांनंतर होत असलेल्या या सोहळ्यामुळे गावातील धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा नव्याने उजळून निघणार आहे. ग्रामस्थांनी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली असून बाहेरगावाहूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात स्वच्छता, सजावट, प्रकाशयोजना आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्री महालक्ष्मीदेवी यात्रोत्सव समिती, हलशी-हलशीवाडी यांच्या वतीने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सह्यांची मोहिम; खानापूर तालुका समितीची बैठक मंगळवारी

Spread the love    खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *