खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या काठावर जुन्या काळातील प्रसिद्ध असलेले तहसील कार्यालय आज मोडकळीस आले आहे.
मात्र खानापूर प्रशासन याकडे डोळेझाक करून बसले आहे. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या इमारतीत तहसील कार्यालय दिमाखात चालू होते. जसेजसे दिवस जातील तसे इमारत कुमकुवत होत गेली. आणि शेवटी तहसील कार्यालय हे पणजी-बेळगाव महामार्गावरील शिवस्मारक चौकाजवळ उभारण्यात आले. तेव्हापासून जुन्या तहसील कार्यालयास घरघर लागली आहे. त्या तहसील कार्यालयाला लागूनच पोलिस खात्याचे सीपीआय ऑफिस होते. ती इमारत रिकामीच आहे.
तेव्हा जवळपास तीन एकर जमिनीवर दोन कार्यालये ओस पडली आहेत. तरी खानापूर प्रशासनाला जाग नाही.
जुन्या तहसील कार्यालयात सध्या रेव्हेन्यू इन्स्पेक्टर कार्यालय चालू आहे. ते ही धोक्याचेच. या जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवर लोकोपयोगी कार्यालय उभे करून शहरवासीयांना त्याचा लाभ व्हावा. यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
खानापूर शहराच्या मोक्याच्या ठिकाणी जवळपास तीन एकर जमीन असलेल्या जागेवर खानापूर तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालय व सर्कल कार्यालय उभी करावी, तसेच भाजी मार्केटची योजना आमलात आणावी, अशी मागणी खानापूर जनतेतून होताना दिसत आहे.
