खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर कारखान्याला तालुक्यातील ज्या शेतकर्यांनी ऊस पुरवठा केला आहे त्या शेतकर्यांची ऊसाची बिले 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्तता केली आहे, त्यानंतर ज्या शेतकर्यांनी या कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे त्यांची बिले स्थगित ठेवण्यात आली आहेत त्यामुळे ती बिले लवकरात लवकर द्यावीत, अशी मागणी युवा समितीने कारखाना प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आधीच कोरोनाच्या महामारीमुळे शेतकर्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशातच शेतकर्यांची बिले स्थगित ठेवल्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत भर पडली असून 15 नोव्हेंबरनंतर ज्या शेतकर्यांनी आपल्या कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे अशा शेतकर्यांची बिले आठ दिवसात शेतकर्यांच्या खात्यावर बँकेत जमा करावी अन्यथा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे शेतकरी बांधवाना सोबत कारखान्याच्या गेट समोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच कारखाना प्रशासनाने या गोष्टीची नोंद घ्यावी याकरिता हे निवेदन देण्यात आले आहे.
