
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी मध्यंतरी ऐक्याचे वारे वाहू लागले होते. त्याचे समितीप्रेमी नागरिकांनी स्वागतही केले. पण हे ऐक्य अजूनही दृष्टीपथात दिसत नाही. अशातच तालुका समितीच्या कार्यकारिणी निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या वेळच्या 2018 मधील विधानसभा निवडणुकीपासून तालुका समिती दोन गटात विखुरली गेली. खानापूर युवा समिती स्थापन झाल्यापासून ऐक्यासाठी पुढाकार घेतला गेला व प्रयत्नही केले. पण राष्ट्रीय पक्षाशी संधान बांधून असलेल्या महाभागानी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे ऐक्य घडवून आणण्यासाठी एका गटाने प्रारंभी पाच सदस्यीय समितीची स्थापना झाली. या समितीने एकीची प्रक्रिया सुरू केली. दिनांक 24 मार्च रोजी हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकीची प्रक्रिया पूर्ण झाली व 4 एप्रिल रोजी नुतन कार्यकारिणीची निवड करण्याचे ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने एक बैठकही घेण्यात आली. मात्र त्यामध्ये कार्यकारिणी निवडण्या ऐवजी दोन्ही गटातून प्रत्येकी 8 सदस्य घेऊन 16 जणांची एक समिती स्थापन करण्याचे ठरले व इथेच कार्यकारिणी निवडीच्या प्रक्रियेला खीळ बसली. यामध्ये एका माजी आमदाराचे कटकारस्थान असल्याचे बोलले जात आहे. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी समितीत दुफळी निर्माण केली व वैयक्तिक स्वार्थासाठी एका राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला. मात्र जाताना त्यांनी आपली काही प्यादी समितीमध्ये ठेवली आहेत. ती प्यादी इमानेइतबारे आपले काम करीत आहेत की काय? अशी शंका व्यक्त होत आहे. कारण एकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रत्येक वेळी त्यात अडथळा आणण्याचे काम त्यांच्याकडूनच सुरू आहे.
दरम्यान, खानापूर तालुका समितीची निर्धार सभा व जनजागृती या संदर्भात एक बैठक घेण्यात आली. त्यात ग्रामदेवता चौराशीदेवी मंदिरात शपथबद्ध होऊन कुप्पटगिरी येथून जनजागृती सभा घेण्याचे ठरविण्यात आले. अशी माहिती दोन्ही गटातील सर्वांसमक्ष पत्रकार परिषदेत देण्यात आली. मात्र बैठकीतून बाहेर पडल्यानंतर एका गटाच्या विद्वानाने आपल्या गटातील प्रत्येकाला फोन करून निर्धार सभेस उपस्थित न राहण्यास सांगितले तर काहींना मज्जाव देखील केला. जर एका गटाला जनजागृती सभेस विरोध होता तर त्यांनी बैठकीत विरोध का केला नाही? पत्रकार परिषदेत आपली भूमिका का मांडली नाही? का या गटाची सूत्रे बाहेरील व्यक्तीकडे आहेत? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
5 मे रोजी ठरल्याप्रमाणे निर्धार सभा झाली. या सभेस माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, मारुती गुरव, सदानंद पाटील, यशवंत बिरजे, विवेक गिरी यांच्यासह दुसर्या गटाचे प्रमुख देवाप्पा गुरव हे देखील उपस्थित होते. पण स्वतःला मध्यवर्ती समितीशी संलग्न समजल्या जाणार्या गटाने कुप्पटगिरी येथील सभेला न जाण्याचा निर्णय घेतला त्यांचा बोलविता धनी कोण आहे? असा प्रश्न खानापूरवासियांना पडला आहे. त्यामुळे दोन्ही गटात आणखी दुफळी निर्माण झाली की काय? अशी शंका व्यक्त होत आहे. ही निर्धार सभा खरेतर खानापूर तालुका मर्यादित होती. पण बेळगावचा शक्तिमान या सभेस उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सभेस उपस्थित राहून त्यांनी काय साध्य केले? कोणाच्या सांगण्यावरून ते उपस्थित राहिले? त्यांना रीतसर निमंत्रण दिले होते का? असे प्रश्न जाणकार मंडळींना पडले आहेत.
वास्तविक पाहता तालुका समितीची रचना होणे गरजेचे आहे. लढ्याची दिशा ठरविण्यासाठी तसेच समिती बळकट करण्यासाठी सर्वप्रथम कार्यकारिणीची निवड करून त्यानंतर जनजागृती मोहीम हाती घेणे आवश्यक होते. असे असताना कार्यकारिणी निवडीला बगल देऊन जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली.
दोन्ही गटाच्या नेत्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे समितीचे पर्यायाने सीमावासीयांचे नुकसान होत आहे. नेत्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे आज समितीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. युवा पिढी राष्ट्रीय पक्षाकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे समितीने आपसातील मतभेद बाजूला ठेवून स्पष्ट भूमिका घ्यावी असे मराठी जनतेला वाटते.
खानापूर राजकीयदृष्ट्या खूप प्रगल्भ आहे. विशेषत: खानापूर समितीत दिग्गज मंडळींचा भरणा आहे. एखादी समस्या उद्भवली तर ती सोडविण्याची क्षमता या दिग्गजांमध्ये आहे. अशावेळी बेळगाव शहरातील म. ए. समितीच्या नेत्यांचे स्वत:चे मतभेद चव्हाट्यावर असताना ते मतभेद सोडविण्यास सक्षम नसताना खानापूर एकीसंदर्भात बेळगाव शहरातील स्वयंघोषित नेत्यांना, कार्यकर्त्यांना लुडबूड करणार्यास वाव का देण्यात आला, असा प्रश्न खानापूरातील समितीप्रेमी जनता विचारू लागली आहे.
क्रमश:
Belgaum Varta Belgaum Varta