
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शाळा इमारतीची बिकट परिस्थिती असतानाच कौंदल (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळा इमारतीत वारूळ उभारल्याने तसेच वर्गखोलीत सापाचे दर्शन झाल्याने विद्यार्थी तसेच शिक्षकवर्गात आणि पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले यांनी कौंदल शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गेल्या काही वर्षापासून चक्क वर्गात वारूळ उभारले आहे. त्यामुळे भिंतीना, खिडक्याना, वाळवी लागत आहे. याचा धोका इमारतीला पोहचला आहे. एवढेच नव्हे तर येथे सापाचे दर्शन होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वर्गात बसणे धोक्याचे झाले आहे.
कौंदल शाळेत इयता पहिले ते पाचवी पर्यंत वर्ग असून ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केवळ दोन वर्ग खोल्या असल्याने एका वर्गात वारूळ असल्याने विद्यार्थ्यांना बसवणे कठीण झाले आहे. त्यामुळे पहिले ते पाचवीपर्यंतचे वर्ग एकाच वर्गात बसविण्याची वेळ आली आहे. आमदार अंजली निंबाळकर यानी भेट देऊन परिस्थितीती पाहिली मात्र कोणत्याही प्रकारची सोय अद्याप झाली नाही. त्यामुळे कौंदल गावच्या नागरिकांतून नाराजी पसरली आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी व तालुका प्रतिनिधी लवकरात लवकर नवीन वर्गखोली मंजुर करावी, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta