खानापूर (उदय कापोलकर) : गेली चार वर्षे राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम रखडलेले आहे. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या शिंदोली, गुंजी, कापोली, मोहिशेत, लोंढा, रामनगर ग्रा. पं. च्या व्याप्तीत येणाऱ्या चाळीस ते पन्नास गावातील नागरिकांना शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर कामासाठी खानापूर येथे दररोज यावे लागते. सदर महामार्गांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. मागच्या वर्षी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली होती. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था पूर्वी सारखीच खड्डेमय झाली आहे. रस्त्याच्या ठेकेदाराला लवकरात लवकर खड्डे बुजवायला लावून रस्ता वाहतूकीस सुरळीत करावा. नाहीतर खड्डे पडलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना देण्यात आला.
निवेदन देताना शिंदोली ग्रा. पं. अध्यक्ष राजेश पाटील, सदस्य प्रा. शंकर गावडा, तालुका ग्रा. पं. असोसिएशनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, म. ए. समितीचे नेते यशवंत बिर्जे, तिओली ग्रा. सदस्य सहदेव हेब्बाळकर, प्रा. महंतेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते तानाजी गोरल, प्रशांत काजुणेकर, मनोज पाटील, नारायण पाटील, यशवंत शेलार, राम गावडा उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta