Friday , November 22 2024
Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे प्रदर्शनासाठी

Spread the love

 

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी आपले मत व सूचना देण्याचे आवाहन

कोल्हापूर (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम येथे जतन करण्यात आली आहेत. ही वाघनखे जनसामान्यांच्या दर्शनाकरीता राज्यास तीन वर्षाकरिता संमती मिळाली आहे. प्राप्त वाघनखे श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा, मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर, लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई या चार संग्रहालयांमध्ये प्रदर्शित करण्याचा शासनाचा मानस आहे. ही वाघनखे प्रदर्शित करणे, त्याची सुरक्षा व प्रवास हे अतिशय जोखमीचे व जबाबदारीचे कार्य असल्याने प्रदर्शनाच्या अनुषंगाने प्रदर्शनाची व्यवस्था, सुरक्षा इत्यादी बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शनाकरीता समिती गठीत करण्यात आली असून या अनुषंगाने कोणाला काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी पर्यटन व सांस्कृतिक विभागास कळवाव्यात, असे आवाहन अवर सचिव सु.दि. पाष्टे यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही देशातील जनतेला प्रेरणादायी आहेत व या प्रसंगाची मोहिनी जनमानसात आहे. त्यामध्ये विजापूरचा सरदार अफजलखान याने सन १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीमध्ये खानाने केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी वाघनखे वापरुन खानाचा केलेला वध या चित्तथरारक घटनेचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे “शिवशस्त्रशौर्य” प्रदर्शनाकरीता प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक समिती स्थापन करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असून समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे – वाघनखांचे इंग्लंड ते भारत या प्रवासातील सुरक्षा सुनिश्चित करणे. सातारा, कोल्हापूर, नागपूर व मुंबई येथील प्रदर्शनाचे स्वरुप व त्याच्या संकल्पना याबद्दल शासनाला शिफारस करणे व त्याबाबत सल्ला देणे. वाघनखांच्या देशांतर्गत प्रवासाची सुरक्षितता सुनिश्चित करणे. “शिवशास्त्रशौर्यगाथा” या प्रदर्शनाचे आयोजन, प्रसिद्धी, त्यासंबंधीची सुरक्षा व्यवस्था व स्थानिक नियोजन याबाबतीत शासनास सल्लामसलत व आवश्यक ते सर्व सहकार्य प्रदान करणे. प्रदर्शनासाठी आवश्यक प्रकाशने, डिजिटल मीडिया कव्हरेज, तसेच मराठाकालीन लष्करी खेळांचे प्रदर्शन यासंबंधी शासनास सल्ला देणे. प्रदर्शनात मांडायच्या गोष्टी, त्याचं स्वरुप, ते बघण्याबाबतचे नियम, विक्री केंद्र, प्रसिद्धी व लोकांचा सहभाग या बाबतच्या आराखड्यास अंतिम स्वरुप देणे. तरी याबाबत सर्वसामान्य नागरिकांना काही सूचना असतील, त्यांचे प्रदर्शनासंबंधीचे काही मत असल्यास शासनाला पर्यटन व सांस्कृतिक विभागास किंवा जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे लेखी स्वरुपात कळवावे जेणेकरुन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या प्रकारे पार पडेल.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *