कोल्हापूर : स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर मतदारसंघात काल (मंगळवार) चुरशीने ७१ टक्के, तर हातकणंगलेमध्ये ६८.०७ टक्के मतदान झाले. ही आकडेवारी अंतिम नसून यामध्ये बदल होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रात्री स्पष्ट केले आहे. दरम्यान, मतमोजणी चार जूनला होणार आहे.
चंदगड शहरातील किरकोळ वादावादी आणि हातकणंगले मतदारसंघातील साखराळे (ता. वाळवा) येथील केंद्रावर हमरीतुमरी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत झाली. या दोन्ही मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळे कोल्हापूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा झाला होता. त्याचे प्रतिबिंब आज मतदानतही उमटले होते. उन्हाचा तडाखा असूनही मतदारांनी उत्साह कायम राखला.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त होता. काही संवेदनशील केंद्रावर शस्त्रधारी बंदोबस्त होता. मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर उशिरापर्यंत रांगा होत्या. कोल्हापूर मतदारसंघातून प्रमुख उमेदवारांसह २३ तर हातकणंगले मतदारसंघातून २७ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरात उमेदवार जास्त असले तरी प्रमुख लढत विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यात आहे.
हातकणंगलेमध्ये विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील अशी चौरंगी लढत आहे. काल चुरशीने मतदान झाले. सायंकाळनंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा होत्या. केंद्राबाहेर मतदारांच्या स्वागतासाठी त्या त्या परिसरातील प्रमुख नेते, कार्यकर्ते थांबून होते. अनेक नेत्यांनी आपापल्या बालेकिल्ल्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवले. कोल्हापूर मतदारसंघात सकाळी नऊला ११ टक्के मतदान झाले होते. सकाळी मतदारांचा प्रतिसाद चांगला होता.
हातकणंगलेमध्ये पहिल्या टप्प्यात आठ टक्के मतदान झाले. सकाळी अकराच्या सुमारास कोल्हापूरसाठी २०.७४ टक्के, तर हातकणंगलेसाठी २३.७७ टक्के मतदान झाले होते. उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी मतदानाचा वेग कमी झाला. संध्याकाळी चारनंतर मात्र पुन्हा मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. सायंकाळी पाचपर्यंत कोल्हापूर मतदारसंघात ६३.७१ टक्के मतदान झाले. हातकणंगले मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झाले. काही अपवाद वगळता मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले.
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान यंत्रे आणि मतदान साहित्य विधानसभानिहाय असणाऱ्या संकलन केंद्रावर आणण्यात आले. तेथून ही मतदानयंत्रे जीपीएस असणाऱ्या कार्गो वाहनातून स्ट्राँगरूममध्ये रात्री उशिरा आणण्यात आले. कोल्हापूर मतदारसंघातील मतदानयंत्रे रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात ठेवण्यात आले आहेत, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदानयंत्रे राजाराम तलाव येथील पाटबंधारे विभागाच्या गोदामात ठेवण्यात येणार आहेत. मतदानयंत्रे ठेवण्यापूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनकडून याची पडताळणी करण्यात आली. त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेत स्ट्राँगरूममधील मतदानयंत्रे ठेवण्यात आली आहेत.
सकाळी सातपूर्वीच लोक केंद्रावर
मतदान सकाळी सातला सुरू झाले; पण शहरासह ग्रामीण भागातील काही केंद्रांवर सातपूर्वीच लोकांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. यातून मतदारांत उत्साह दिसून आला. दिवसभर मतदारांचा हाच उत्साह टिकून राहिला. त्यामुळे प्रक्रियेची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर रांगा होत्या. उन्हाच्या तडाक्यातही ग्रामीण भागात मतदानासाठी लोक बाहेर पडल्याचे चित्र दिसत होते.
जिल्हाधिकाऱ्यांचे वॉररूममधून नियंत्रण
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी वॉररूममधून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले. त्यापूर्वी त्यांनी सपत्नीक दत्ताबाळ हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांना भेट दिल्या.
विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी (संध्याकाळी पाचपर्यंत)
कोल्हापूर
चंदगड ६८.१८
कागल ७३.८०
करवीर ७८.८९
कोल्हापूर (उ) ६४.५४
कोल्हापूर (द) ६९.८०
राधानगरी ६६.६८
हातकणंगले
हातकणंगले ७०.००
इचलकरंजी ६६.०५
इस्लामपूर ६७.२०
शाहूवाडी ७०.९६
शिराळा ६५.९६
शिरोळ ६८.००