कोल्हापूर (लक्ष्मण राजे) : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर कलानगरीमध्ये प्रथमच अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने दिनांक २७ आणि २८ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे दोन दिवसीय पहिले मराठी चित्रपट संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या चित्रपट संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे या चित्रपट संमेलनास महाराष्ट्र व देशभरातून अनेक दिग्गज कलाकार, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते आणि राजकीय नेते व कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दोन दिवस चालणाऱ्या या चित्रपट संमेलनास राज्यातून जवळपास ५ हजाराहून अधिक लोक सहभागी होतील असा अंदाज अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी वर्तविला आहे. त्याचप्रमाणे हे कोल्हापूर नगरीतील पहिले संमेलन नक्की यशस्वी होईल, असा विश्वास कोषाध्यक्ष मनिष व्हटकर आणि सहचिटणीस महेश्वर तेटांबे यांनी दिला. कोल्हापूर नगरीतील पहिल्या मराठी चित्रपट संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माननीय राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवड झाल्यामुळे कोल्हापूर नगरीत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
