बेळगाव : कोरोना काळात मृत्यू पावलेल्या एलआयसी एजंटांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जावी, त्याशिवाय या काळातील एलआयसी प्रीमियमवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये तसेच ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाचे व्याजदर रिझर्व्ह बँकप्रमाणे कमी करावे अशा विविध मागण्यांसाठी एलआयसी एजंट फेडरेशनतर्फे 16 ते 30 जून या काळात देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून एलआयसी एजंटांनी बेळगाव येथील शाखा क्रमांक एक समोर फेडरेशनच्यावतीने एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे.
एलआयसी एजंट फेडरेशनने 14 मागण्या ठेवल्या असून त्या मागण्या पूर्ण केल्या जाईतोपर्यंत आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे. 30 जूनपूर्वी मागण्या मान्य झाल्या नाही तर नंतरही आंदोलन सुरू ठेवले जाईल अशी माहिती विभागीय अध्यक्ष किरण कल्लोळ यांनी दिली आहे. हेमंत सोहनी, महेंद्र बागेवाडी आदींनीही आपले विचार मांडले.
या आंदोलनामध्ये कोषाध्यक्ष ज्योतिबा मुतगेकर, पी. के. हदगल, अनिल पाटील, अशोक चौगुले, वासू सामजी, बाळाराम मोटारी, दीपा चौगुले, प्रभावती पाटील, चिदानंद वारके, चन्नेवाडकर, राजू कावळे, परशराम सायनेकर, बाळाराम मोटारी, जी. एल. डोणकरी, एम एस पाटील, परशुराम गुरव, सविता देसाई, यल्लाप्पा कुरबुर यासह अन्य एजंट सहभागी झाले आहेत.