बेळगाव : धामणे रोड साईनगर येथे एक अनोळखी व्यक्ती निपचित पडून असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. नागरिकांनी त्या व्यक्तीची माहिती शहापूर पोलिस ठाण्याला कळविली. शहापूर पोलीस ठाण्याच्या सुजाता वैलापुरकर यांनी घटनास्थळी जाऊन त्या व्यक्तीची माहिती घेतली. सदर व्यक्ती अन्नपाण्याविना भुकेलेली असल्यामुळे त्याची अवस्था दयनीय झाली होती. याकडे लक्ष देऊन सुजाता वैलापुरकर यांनी त्या व्यक्तीच्या जेवणाची व्यवस्था केली. त्याचबरोबर त्या व्यक्ती संदर्भात समाजसेविका माधुरी जाधव यांना माहिती दिली.
त्या व्यक्ती संदर्भात माहिती मिळताच माधुरी जाधव व सहकारी विनय पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या अनोळखी व्यक्तीची आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्या व्यक्तीने आपणाला कोणाचाच आधार नसल्याचे सांगितले. त्यानंतर माधुरी जाधव यांनी त्या व्यक्तीला खासबाग येथील महानगरपालिकेच्या निवारा केंद्रात घेऊन तेथे राहण्याची व्यवस्था केली.
