मुंबई : कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित मालमत्तांच्या झालेल्या कराराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी मंगळवारी सकाळपासून दक्षिण मुंबईतील 10 ते 12 छापेमारी सुरु केली आहे. नागपाडा, भेंडीबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते. राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याचे याप्रकरणाशी संबंध जुळले असल्याचे समोर येत असून ईडीच्या या कारवाईने राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
राज्यात झालेले मोठे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे आणि भ्रष्टाचारांशी संबंधित तक्रारीवरुन सध्या ईडी, सीबीआय, एनआयए, एनसीबी अशा केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील दिग्गज नेते मंडळी, मंत्री आणि आमदार यांची चौकशी करत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे साडे तीन जण गजाआड जातील असा इशारा देत, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे.
राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मंगळवारी सकाळपासून दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापेसत्र सुरू केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले आहेत.
ईडीने दाऊदशी संबंधित केंद्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात काही आर्थिक व्यवहारांबाबत माहिती समोर आली होती. त्याआधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते. छापेमारीमध्ये ईडीच्या हाती काय लागते आणि पुढे कोणत्या बड्या राजकारणी व्यक्तीचे नाव समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक ईक्बाल मिर्ची याच्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने विकास केला होता. पटेल यांच्या कंपनीने येथे सीजे हाऊस नावाची 15 मजली इमारत बांधून मिर्ची फॅमिलीला तिसर्या मजल्यावर 9 हजार चौरस फूट आणि चौथ्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट असे एकूण 14 हजार चौरस फुटांचे बांधकाम दिले होते. ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे. तर, याप्रकरणात ईडीने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला आहे.
ईडीने आतापर्यंत वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील मालमत्तेसह साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, ताडदेवमधील अरुण चेंबसमध्ये असलेले कार्यालय, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन व्यावसायिक दुकाने, बंगले आणि लोणावळ्यातील 5 एकर पेक्षा अधिक जमीन अशा ईक्बाल मिर्चीच्या तब्बल 600 कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.
