Saturday , July 27 2024
Breaking News

“मराठी साहित्य परंपरेत र. वा. दिघे यांचे मौलिक योगदान” : दिलीप गडकरी यांचे गौरवोद्गार

Spread the love

मान्यवरांच्या उपस्थितीत खोपोलीत र. वा. दिघे यांची जयंती साजरी !

खोपोली (लक्ष्मण राजे) : “मराठी साहित्य परंपरेत आपल्या लेखणीने व्यापक मानवतावादी विचार, मूल्य व आधुनिक दृष्टी देणारे ज्येष्ठ साहित्यिक र. वा. दिघे यांचे योगदान मोलाचे आहे. केवळ खोपोली, रायगड जिल्हा किंवा महाराष्ट्रातच नाही तर सबंध मराठी साहित्य विश्वात र. वां.च्या साहित्यलेखनाने रसिक वाचकांना कायम नवी दृष्टी दिली. ग्रामीण व प्रादेशिक साहित्य परंपरेत मोलाची भर घालणारे र. वा. दिघे हे मोठे लेखक होते, असे गौरवोद्गार मुक्त पत्रकार व लेखक दिलीप गडकरी यांनी काढले. खोपोलीतील र. वा. दिघे स्मारक व वाचनालयात रवांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोमसाप खोपोली शाखेचे सल्लागार तथा वसंत देशमुख मेमोरियल स्कूलचे अध्यक्ष श्री. उल्हासराव देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा- खोपोली व खोपोली नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जयंतीच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत र. वा. दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना दिलीप गडकरी यांनी लेखक र. वा. दिघे यांच्या साहित्यलेखनाचा विस्तृत आढावा घेतला. र. वा. दिघे यांचे कार्य केवळ साहित्यापुरते मर्यादित नव्हते तर प्रगतीशील शेतकरी, अर्थतज्ज्ञ, कायद्याचे अभ्यासक अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा लेखक म्हणून त्यांचा गौरव होतो. ‘पाणकळा’, ‘सराई’, ‘पड रे पाण्या’, ‘सोनकी’, ‘आई आहे शेतात’, ‘हिरवा सण’ अशा कादंबऱ्या व कथालेखनातून शेतकरी व सामान्य माणसाचे जीवनचित्रण केले. असे असले तरी दिघे यांच्या साहित्यिक योगदानाची नोंद मराठी साहित्य परंपरेत फारशी घेतली गेली नाही, याबद्दलची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. नव्या पिढीपर्यंत र. वा. दिघे यांचे साहित्य पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजे आहे, असे ते म्हणाले. खोपोली कोमसाप शाखेचे उपाध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये यांनी प्रास्ताविक व सर्व मान्यवरांचे स्वागत केले. र. वा. दिघे यांच्या स्नुषा व कोमसाप खोपोली शाखेच्या अध्यक्षा लेखिका सौ.उज्वला दिघे, वामनराव दिघे, जिल्हा प्रतिनिधी कवयित्री रेखा कोरे, के.एम.सी. महाविद्यालयाचे डॉ. भाऊसाहेब नन्नवरे यांनी र.वा. दिघे यांच्या साहित्य व लेखन कार्याबद्दल आपली मनोगते व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात उल्हासराव देशमुख यांनी र. वा. दिघे यांनी मराठी साहित्य परंपरेत दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव केला. खोपोलीकर रसिकांना अभिमान आणि गौरव वाटावा असा हा लेखक आपल्या पंचक्रोशीत घडला, याचा आनंद आहे, असे ते म्हणाले. महाविद्यालयीन युवा पिढीमध्ये साहित्य, लेखन व वाचनाची प्रेरणा रुजवण्यासाठी ‘कोमसाप’च्या माध्यमातून अनेकविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी रविंद्र बेलसरे, प्रा.अण्णासाहेब कोरे, नरेंद्र हर्डीकर, हेमंत नांदे, विजय घोसाळकर, सौ. जयश्री पोळ, सौ. मधुमिता पाटील यांच्यासह खोपोलीतील साहित्य रसिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, वाचनालयाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
नगरपरिषद वाचनालयाचे सहा.ग्रंथपाल चैतन्य देशमुख यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

सांगलीत भूकंपाचे धक्के; चांदोली धरण परिसरात जमिन हादरली, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Spread the love  सांगली : सांगलीच्या चांदोली धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. धरणातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *