बेळगाव : भारत सरकारकडून देशातील जनतेला मोफत लस दिली जात आहे. मात्र लसीकरणाच्या नावावर बेळगावातील लोकप्रतिनिधींनी स्वतःची जाहिरातबाजी चालवली आहे. सरकारकडून येत असलेल्या लसींवर बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःची मक्तेदारी निर्माण केली आहे. बेळगावात लसीकरणावरून सुरू असलेले राजकारण अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लसीकरणाची मोहीम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य त्या पद्धतीने धोरण आखावे. अन्यथा, लसीकरणाच्या राजकारणा विरोधात आवाज उठवला जाईल, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिला आहे.
आज सायंकाळी मराठा मंदिर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड विलगीकरण केंद्रात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, शुभम शेळके यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर आगामी काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आरोग्य सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या केंद्रात गरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. लसीकरणाचे काम या केंद्रात होणार आहे. त्याचबरोबर पुढील काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने वैद्यकीय अनेक शैक्षणिक सेवेवर भर देऊन काम केले जाणार आहे असेही स्पष्ट केले. यावेळी युवा समितीचे श्रीकांत कदम, मदन बामणे, सचिन केळवेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.