नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ’माती वाचवा आंदोलन’ कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताचे प्रयत्न बहुआयामी आहेत. हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य असताना भारत हा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, जगातील मोठे आधुनिक देश पृथ्वीवरील अधिकाधिक संसाधनांचे शोषण तर करत आहेतच, पण जास्तीत जास्त कार्बन उत्सर्जनही ते करत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही ठरवले आहे की, आम्ही गंगेच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊ. नैसर्गिक शेतीचा एक मोठा कॉरिडॉर तयार करू. यामुळे आपली शेतं केवळ रसायनमुक्त होणार नाहीत, तर नमामि गंगे मोहिमेलाही नवं बळ मिळेल.
देशातील जनता जलसंधारणाशी जोडली जात आहे
विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी आपल्या देशातील शेतकर्याला त्याची माती कोणत्या प्रकारची आहे, त्याच्या जमिनीत काय कमतरता आहे, याची माहिती नव्हती. या समस्येवर मात करण्यासाठी देशातील शेतकर्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली. कॅच द रेन सारख्या मोहिमेद्वारे आम्ही देशातील जनतेला जलसंधारणाशी जोडत आहोत. या वर्षी मार्चमध्येच देशात 13 मोठ्या नद्यांच्या संवर्धनाची मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासोबतच नद्यांच्या काठावर जंगले लावण्याचे कामही करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, माती वाचवण्यासाठी आम्ही पाच प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. पहिले – माती रसायनमुक्त कशी करावी. दुसरे – मातीत राहणारे जीव कसे वाचवायचे, ज्याला तांत्रिक भाषेत तुम्ही Soil Organic Matter म्हटले. तिसरे- जमिनीतील ओलावा कसा टिकवायचा, तोपर्यंत पाण्याची उपलब्धता कशी वाढवायची. चौथे, कमी भूजलामुळे जमिनीचे होणारे नुकसान कसे दूर करायचे आणि पाचवे, वनक्षेत्र कमी झाल्यामुळे जमिनीची सतत होणारी धूप कशी थांबवायची.
